राहुरीत वाहनचालकाला मारहाण; रोख रकमेसह मोबाईल लंपास

    राहुरी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बस स्थानकातून भाडोत्री होंडा सिया गाडी आणून चालकास तीन अज्ञात दरोडेखोरांनी राहुरीच्या एका डोंगराळ भागात नेले. त्यानंतर एका झाडाला बांधून जवळील रोख रक्कम, चारचाकी गाडी, मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

    बार्शी येथून राहुरी येथे भाडे घेऊन आलेल्या चारचाकी वाहनचालकाला तिघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या ताब्यातील सियाज कंपनीची चारचाकी व एक हजार रूपये रोख असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. राहुरी शहरातील व्यावसायिक संतोष लोढा यांचे व्याही अतुल माणिकचंद राठोड हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे एम एच १३ बी एन ६३५५ क्रमांकाची सियाज कंपनीची चारचाकी कार आहे. त्या गाडीवर नवाब मोहम्मद पठाण राहणार बार्शी हा चालक म्हणून काम करतो. २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान बार्शी बस स्थानक परिसरात तिघेजण राहुरीकडे येण्यासाठी वाहन शोधत होते. त्यावेळी त्यांनी तेथील एका रिक्षाचालकाला चौकशी केली. त्या रिक्षाचालकाने नवाब पठाण याला बोलावून घेतले.

    राहुरी येथून एका महिला पेशंटला घेऊन यायचे असे सांगून त्यांनी ११ रूपये किलोमीटरप्रमाणे नवाब पठाण याच्या ताब्यातील सियाज गाडी भाडोत्री घेतली. सायंकाळी तेथून निघाल्यावर रात्री बारा वाजेदरम्यान ते राहुरी येथे आले. या भामट्यांनी चालकाला गाडी मल्हारवाडी रोडकडे घेण्यास सांगितले. घोरपडवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात गेल्यावर त्या तिघांनी नवाब पठाण या चालकाला मारहाण करून त्याला रूमाल व चार्जरच्या केबलने झाडाला बांधून ठेवले. त्याच्याजवळील एक हजार रूपये रोख व गाडी असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले.

    चालक नवाब याने कशीबशी स्वतःची सुटका करून जवळच असलेल्या एका वस्तीवर गेला. आणि बार्शी येथील त्याच्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्याने गाडी मालक अतुल माणिकचंद राठोड यांना सांगितले. अतुल राठोड यांनी त्यांचे राहुरी येथील व्याही संतोष लोढा यांना खबर केली. संतोष लोढा व अतुल राठोड यांनी चालक नवाब याला घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.