‘कोथाळे’ स्मार्ट गाव करणार : सरपंच दत्तात्रय मोटकुळे

  मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात फक्त अडीच हजार लोकसंख्या असणारे कोथाळे हे छोटेसे व सुंदर गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. या ग्रामपंचायतीवर गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. ९ सदस्य संख्या असल्याने गाव छोटंसं वाटत असलं तरी संपूर्ण बागायती क्षेत्र आहे. या गावात सर्वच जाती धर्माची लोकं वास्तव्यास आहेत. २३ फेब्रुवारी २०२१ पासून सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारली असून छोटेसे असणारे सुंदर गाव आणखी स्मार्ट करण्यावर भर देणार असल्याचा मनोदय सरपंच दत्तात्रय मोटकुळे सर यांनी व्यक्त केला.

  गावकऱ्यांच्या साथीने गाव केले कोरोनामुक्त

  सध्या जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करत आमच्या छोटाशा गावाने गाव कोरोनामुक्त ठेवले आहे. यामध्ये मला गावच्या उपसरपंच सविता बळीराम पवार व इतर सर्व ग्रा प सदस्य, कोरोनामुक्त ग्राम समिती आदींची मोलाची मदत मिळाली. आम्ही कोरोनाच्या काळात गावात ट्रॅक्टरच्या साह्याने सॅनिटायझरची फवारणी केली. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी जनजागृती केली.

  तसेच नो मास्क नो एन्ट्री व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियमांची अंमलबजावणी केली व गाव कोरोनामुक्त केले. गावामध्ये २१ जून ला लसीकरण शिबीर आयोजित करून ४५ वर्षावरील लोकांना लसीची मात्रा देण्यात आली आहे. येत्या १० दिवसात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणार असल्याचे सरपंच मोटकुळे यांनी सांगितले.

  गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण

  गावाच्या परिसरात ग्रामपंचायत कार्यालयासमोर जि प शाळेसमोर, कुंतीमाता मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसविले आहेत, गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण केले. काही रस्त्याचे काम बाकी आहे, गावात रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाज बांधवांना घरे मिळवून दिली आहेत. आणखी काही घरकुलांचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

  निधी प्राप्त होताच त्यांच्याही घराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर व वाड्या वस्त्यांवर सौर दिवे बसविले आहेत. तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या खासदार फंडातून स्मशानभूमी तसेच वॉल कंपाउंड व समाजमंदिर बांधण्यात आले आहे. गावामध्ये विविध ठिकाणी बोअर पाडून त्याठिकाणी हातपंप बसविले आहेत. इत्यादी कामे माझ्या निवडी आधीच आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने पुढे आणखी विकास कामे करणे सोपे होणार आहे. तसेच कोथाळे गावाला आदर्श गाव करण्याचा संकल्प असल्याचे मोटकुळे यांनी सांगितले.

  देवस्थानला ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न

  तीर्थक्षेत्र कुंतीमाता ह्या देवस्थानामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडत आहे सध्या देवस्थान ‘क’ दर्जा मध्ये आहे आगामी काळात देवस्थानला ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे पार्टी प्रमुख तसेच काँग्रेसच्या सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार यांच्या माध्यमातून राज्यशासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

  (शब्दांकन : दादासाहेब गायकवाड)