शिवशाही की दडपशाही? आडम मास्तर यांचा जळजळीत सवाल

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाच्या समर्थनार्थ आंदोलनात आडम मास्तर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना अटक !

    सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन हे शासनामध्ये विलीनीकरण करून या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व त्या प्रकारचे सर्व सुविधा लाभ मिळण्याकरिता राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले. या दरम्यान या संपातील आंदोलन कर्त्यांवर राज्याचे परिवहन मंत्री यांनी मेस्मा लावण्याची धमकी दिली आहे. कामगार आंदोलन मोडून काढून त्या कामगारांना बेचिराख करण्याचा हा बेबंद निर्णय आहे. तर आत्तापर्यंत जवळपास १० हजार कामगारांना निलंबित केले आहे. आणि १५०० रोजंदारी कामगारांना बडतर्फ केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे शिवशाहीचे आहे कि, दडपशाहीचे? असा जळजळीत सवाल कॉ. आडम मास्तर यांनी केला. एस.टी.कर्मचाऱ्यावर मेस्मा लावणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याच्या विरुद्ध आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे ठणकावून सांगितले.

    गुरुवार दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दिलेला असून त्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनाची हाक दिली. त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम (मास्तर) व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. परंतु पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त व पोलिसांचा फौजफाटा तैनात करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केले. परंतु आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पूनम गेट पोलिसांना चकवा देत दाखल झाले. यावेळी प्रथम भारतीय सेना प्रमुख बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या या आडमुठी धोरणाचा निषेध केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्ते पांगवले व कॉ. आडम मास्तर, एम.एच.शेख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाणे येथे रवानगी केली. या दरम्यान सिटूचे राज्य सचिव सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आरिफ मणियार, रवी गेंटयाल, मालू कोकणे आदींचे शिष्टमंडळ तहसीलदार यांना निवेदन दिले.

    यावेळी सदर बझार पोलीस ठाण्यात अनिल वासम, युसुफ शेख (मेजर), नसीमा शेख, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विजय हरसुरे, सुवर्णा गुंडू आदींसह ११ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी निवेदनात असे म्हंटले आहे कि, महाराष्ट्र राज्य एस टी कामगार व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन स्वबळावर करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला सिटूने पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा दिला असून सिटूच्या जिल्हा कमिट्यांनी डेपो स्तरावर जाऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. या आंदोलनास राजकीय वळण न देता त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत.

    कामगारांचा लढा मोडीत काढण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली, प्रवाशांची सोय करण्याच्या नावाखाली खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करणाची परवानगी दिली, सेवा समाप्तीच्या धमक्या दिल्या. राज्य सरकारच्या या कृतीला सीटू चा तीव्र विरोध आहे.
    सध्या खाजगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असून अमाप भाडे आकारले जात असून कांही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सरकारच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे एकीकडे अनेक वर्षे जीव धोक्यात घालून कमी पगारात काम करणाऱ्या एसटी कामगारांना दाद दिली जात नाही तर दुसरीकडे गरीब व गरजू प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.म्हणून राज्य सरकारच्या अशा निष्ठूर धोरणा विरुध्द सिटूने पुढाकार घेऊन त्यांच्या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सबब आज दि ९ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाद्वारे विनंती आहे कि, मा मुख्यमंत्री, मा. परिवहन मंत्री यांनी एसटी कामगारांच्या मागण्या व प्रवाशांची अडचण व लूटबाबत, त्यांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेणे व महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात. याला सिटू समर्थन देत असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी आंदोलन हे उग्र स्वरूपाचे असेल असा इशारा सिटू कडून देण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविले.