‘स्किल बुक’ ॲपचे लाँचिंग लवकरच; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मूळचे बार्शी (जि.सोलापूर) येथील किरण प्रकाश झरकर यांनी देशातील विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी डिजिटल स्कूल बुक (Skill Book) हे वेब पोर्टल तयार केले आहे. सध्या ते वाशी (जि.उस्मानाबाद) येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्पनिदेशक या पदावर कार्यरत आहेत.

    झरकर यांचे स्किल बुक या संगणक संगणकीय प्रणालीचे पेटंट केंद्र शासनाच्या वतीने नुकतेच प्रकाशित केले आहे. स्टार्ट अप इंडिया या केंद्राच्या योजनेअंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकतेअंतर्गत हा प्रकल्प आहे. एक लाख कौशल्याशी जोडणारे हे स्किल बुक असून, लवकरच ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगन्नाथ पुरी येथील जगद्गुरु निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज, राम मंदिर निर्माण व्यासचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, स्वामी रामदेव बाबा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच प्रकाशित होणार आहे.

    स्किलबुक हे संपूर्ण स्वदेशी मोबाईल संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींच्या किमान कौशल्य विकास या योजनेला बळ मिळणार आहे. दिल्लीत मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 2014 रोजी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया चा नारा दिला होता ; हाच धागा पकडून आयटीआयचे शिक्षक असलेल्या झरकर यांनी मागील पाच वर्षापासून या विषयावर सखोल अभ्यास करून संपूर्ण स्वदेशी बनावटीचे स्किल बुक हे ॲप तयार केले आहे. विशेष म्हणजे आयटीआयच्या शिक्षकांना शासनाकडून संशोधनासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसताना त्यांनी स्वतः हे ॲप तयार केले आहे.

    फेसबुकच्या चौपट मोठा हा प्रकल्प स्किलबुकच्या माध्यमातून तयार झाला आहे. स्कील बुकच्या उत्पादनातून विशेषतः विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सुमारे एक लाख कौशल्याचे अनेक प्रकार तयार करण्यात येणार आहेत. यात अभ्यासक्रम, सेवा कौशल्य, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत. स्किल बुक हे पेटंट प्रकाशित करताना त्यांना पुण्याच्या युनिक आयपीएल सर्विसेस च्या संचालिका मधुवंती केळकर यांच्यासह सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद येथील वरिष्ठ सहकार्‍यांचे सहकार्य लाभले आहे. झरकर यांना अनेक पुरस्कारही मिळाले असून दलित व गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिल्याबद्दल कॉमनवेल्थ समूहाने त्यांना सन्मानित केले आहे.