नागरी जागृतीतूनच साथ आटोक्यात : जिल्हाधिकारी शंभरकर

    सोलापूर : गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर भयावह स्थिती निर्माण झाली. अशा काळात घाबरलेल्या नागरिकांना धीर देऊन कोरोनाची वाढती साखळी तोडण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते. अशा काळात जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, आरोग्य विभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हावासियांना विश्वासात घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी जिल्ह्यावर कडक निर्बंध लावले गेले. कडक निर्बंधात जिल्ह्यातील नागरिकांनी प्रामाणिकपणे शासन आणि प्रशासनाला साथ दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वजण जागरूक राहिले. त्यामुळेच कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात यश मिळाले, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आरोग्य यंत्रणेशी सततचा समन्वय, प्रशासकीय कामकाजाचा काटेकोर अंमल आणि नागरी जागृतीतूनच हे शक्य झाले. एप्रिल आणि मे महिन्यातील भयावह स्थितीला आटोक्यात आणणं इतकं सहज नव्हतच. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असो…ऑक्सिजनचा तुटवडा असो…या बाबी प्रशासकीय बाब म्हणून ताब्यात घेतल्या आणि त्याचा सुयोग्य पुरवठा केला. परिणामी संसर्ग नियंत्रणात आणण्यास यशस्वी ठरलो. अन्यथा सोलापूरच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते याची कल्पना आम्ही केलेली नव्हती. पण, ग्रामीण भागातील जनता असो किंवा शहरी भाग असो कडक निर्बंधातून आम्ही कोरोना विषाणूला रोखू शकलो.

    उपलब्ध साधन सामग्री, अधिग्रहण केलेले खासगी रुग्णालयातूनच वैद्यकीय सेवा मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. त्याला लसीकरणाची मोहीम देखील जोडून दिली. त्यामुळेच लसवंत झालेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह होऊनही त्यांचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळेच मृत्यू दर आटोक्यात आणण्यात यश मिळविले. शिवाय पॉझिटिव्हिटी दर देखील दहा टक्क्यांच्या आतच ठेवण्याचे कसोशीने प्रयत्न झाले. परिणामी आज मृत्यू आणि पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आतच आहेत. शहरातील संसर्ग तर आता शून्यावर येतोय हे प्रशासकीय कामाचे यश म्हणावे लागेल.

    पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर दुसऱ्या लाटेनेही सोलापूरला घेरले. अशा काळात महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप तळमळीने काम केले. त्यामुळेच दुसरी लाट थोपविण्यात यश मिळाले. याच दरम्यान म्युकरमायकोसिस नावाच्या आजाराने सोलापूरला गाठले. त्यालाही थोपविण्यासाठी नेटके नियोजन केले. या साथीच्या म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३२ रुग्णालये अधिग्रहित केले. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस ४८० रुग्ण आढळले. त्यातून २७३ रूग्णांनी त्यावर मात केली. १५९ रुग्णांवर आजही उपचार सुरू आहेत. तर दुर्दैवाने ४९ लोकांचा मृत्यू झाला, याची खंत आहे.

    सोलापूर जिल्ह्यात १ लाख ५९ हजार ६०६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातून १ लाख ५२ हजार ६७२ लोक बरे झाले. तर ४ हजार ३१४ लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याचे मोठे दुःख आहे. आजही २ हजार ६१० लोकांवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ३.५ टक्के तर मृत्यू दर २.७ टक्के इतका आहे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या येणाऱ्या संभाव्य लाटेत लहान बालकांना अधिक धोका असल्याचा अंदाज आहे. तिसर्‍या लाटेत सोलापूर जिल्ह्याचे अधिक नुकसान होऊ नये. यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे.