सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यभर डंका ; ग्रामीण भागात १ लाख ८०हजारांची नळ जोडणी

ग्रामीण भागातील नळ जोडणीचे सोलापूर जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण

   

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यभरात डंका वाजत आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन अंर्तगत ग्रामीण भागात १ लाख ८० हजार ५८२ नळ जोडणी करण्यात आली आहे.

  याबाबत माहीती आशी की २०२०-२१ करिता १८१२७४ एवढे उद्दिष्ट ३१ मार्च २०२१ अखेर पूर्ण करावयाचे होते. परंतु मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत कोरोना काळात कडक लॉकडाऊन, कार्यालयात कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती, गाव पातळीवर लॉकडाऊनमुळे कामातील येणाऱ्या अडचणी त्याचप्रमाणे ग्रामसेवक व इतर अधिकारी कर्मचारी मुख्यत्वे कोरोना संबंधित कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे वरील कालावधीत प्रत्येक घरी नळजोडणी कार्यक्रमामध्ये अडचणी निर्माण होऊन कामे झाली नव्हती. या कालावधीत फक्त दहा हजार नळजोडणीचे काम पूर्ण झाले होते.

  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये पदभार घेतल्यापासून या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. स्वामी यांनी विभागीय स्तरावर, मुख्यालय स्तरावर व तालुकास्तरावर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, गटविकास अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका व सर्वसमावेशक कार्यशाळा, त्याचप्रमाणे दररोज व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व प्रत्येकाशी फोन द्वारे संवाद साधून या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. आणि आज या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षभराचे काम नोव्हेंबर ते मार्च या चार महिन्यात पूर्ण करण्यात यश प्राप्त झाले आहे. या यशामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता,शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक व अनेक नळजोडणी कारागीर यांच्या उत्कृष्ट टिमवर्कमुळे अवघड वाटणारे काम लीलया पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सीईओ यांनी कार्यपूर्ती पंधरवडाचे आयोजन केले होते. यामध्ये ५ मापदंड देण्यात आलेले होते.

  -अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करणे.
  -गावांतर्गत उपलब्ध नमुना नंबर ९ व २४ नोंदवह्या IMIS पोर्टलवर अद्ययावत करणे.
  -पंतप्रधान आवास योजना/शबरी/पारधी आवास इ. योजनेतील घरकुलांना प्राधान्याने नळजोडणी देणे.
  -गावातील स्टँड पोस्ट कमी करून वैयक्तिक नळजोडणी वर भर देणे.
  -केलेल्या कामास फोटो व व्हिडिओ द्वारे व्यापक प्रसिद्धी देणे.

  ३ ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार पंधराव्या वित्त आयोगातील पन्नास टक्के निधी केवळ नळ जोडणीसाठीच वापरण्यात येणार असल्याने भविष्यात प्रत्येकाला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.

  “कोरोना कालावधीत जे काम पूर्ण होणे अशक्य वाटत असताना मा. स्वामी साहेबांच्या रूपाने एक संजीवनी आम्हाला प्राप्त झाली तिच्या उर्जेने आम्ही झपाटून कामाला लागलो आणि आज अशक्य वाटणारे काम पूर्ण करू शकलो ”

  -सुनील कटकधोंड, ग्रा.पा.पू.कार्यकारी अभियंता

  “आतापर्यंतच्या सेवेमध्ये अनेक कामे वेळेत पूर्ण केली आहेत. उद्दिष्ट मिळत असते ते आपल्याकडून पूर्ण होत ही असते परंतु सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून चार महिन्यात जिल्ह्यातील अनेक घरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे काम उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कमी कालावधीत पूर्ण केले याचा मनस्वी आनंद होत आहे. या कार्यपूर्ती मध्ये यंत्रणेतील सहभागी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करीत आहे. ”

  -दिलीप स्वामी, सीईओ

  फक्त चार महिन्यात वर्षाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे अद्वितीय काम दिलीप स्वामी यांच्या कुशल नेतृत्वामुळे पार पडले. जिथे इच्छा तिथे मार्ग

  -आर.विमला, मिशन डायरेक्टर महाराष्ट्र राज्य.

  सोलापूर जिल्ह्यात जोडणीचे काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झाले आहे. हे काम करीत असताना जल जीवन मिशन बद्दल गावकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती केल्यामुळे लोक पाणीपट्टी भरण्यास स्वतःहून येत आहेत. पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे वीज पुरवठा तोडलेल्या अनेक पाणी पुरवठा योजना वीज देयक भरून पुन्हा वीज जोडणी झाल्यामुळे कार्यान्वित करणे शक्य झाले आहे.