जि.प.सदस्य उमेश पाटील विरुध्द मोहोळमध्ये तलाठ्यांचा संप

एकुरके (ता. मोहोळ) येथे १३ डिसेंबर रोजी जनतेच्या तक्रारी ऐकताना कोणतीही शहानिशा न करता तलाठ्यांची बदनामी करणारे विधान पाटील यांनी केले होते. याच्या निषेधार्थ तलाठी संघटनेने १५ व १६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. तर गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील सुमारे १०४ गावांमधील ३८ तलाठी, ६ मंडल अधिकाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले आहे.

    मोहोळ : जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी तलाठ्यांबाबत केलेल्या चुकीच्या विधानाच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्वच तलाठ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, शैक्षणिक दाखले, शासकीय कामे रखडली आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील, असा पावित्रा मोहोळ तालुका तलाठी संघाने घेतला आहे.

    एकुरके (ता. मोहोळ) येथे १३ डिसेंबर रोजी जनतेच्या तक्रारी ऐकताना कोणतीही शहानिशा न करता तलाठ्यांची बदनामी करणारे विधान पाटील यांनी केले होते. याच्या निषेधार्थ तलाठी संघटनेने १५ व १६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. तर गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील सुमारे १०४ गावांमधील ३८ तलाठी, ६ मंडल अधिकाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची कामे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, शासकीय कामे रखडली आहेत.

    यावेळी तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष चक्रधर अचलारे, उपाध्यक्ष विक्रम पाटोळे, सचिव मुशीर हकीम, कार्याध्यक्ष प्रमोद सोनटक्के, संघटक अनिल बागल, कोषाध्यक्ष नामदेव रेळेकर, सहसचिव बुद्धाजी बेले, सल्लागार अरविंद काळे, मंडल अधिकारी बिभीषण वागज, मंडल अधिकारी बापू सुरवसे, अव्वल कारकून संदीप गायकवाड, विकास चव्हाण, हनुमंत चव्हाण, जयवंत सोडगे, दिनेश साळुंखे, विकास सिद्धेश्वर नकाते, नंदकुमार दांडगे आदींसह तलाठी बांधव उपस्थित होते.

    दरम्यान, याबाबत भाजपनेते संजय क्षीरसागर यांनी तहसीलदारांची भेट घेऊन गेल्या आठ दिवसांपासून तलाठी संपामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादीच्या दोन गटातील अंतर्गत कुरघोडीमुळे तालुका भरडला जात आहे. याबाबत विद्यमान आमदार अथवा राष्ट्रवादीचे नेते मध्यस्थी करण्यास तयार नाहीत. त्यांनी त्यांचे मतभेद वरिष्ठ स्तरावरून मिटवावेत, मात्र तालुक्यास वेठीस धरू नये, तलाठ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे.