‘त्या’ निष्क्रिय पोलिस निरीक्षकाला निलंबित करा; प्रभाकर देशमुख यांची मागणी

मरवडे येथील दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असलेले आरोपी तब्बल दहा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप मोकाट आहेत. याला मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हेच पूर्णत: जबाबदार असल्याचा आराेप करण्यात आला.

    मंगळवेढा : मरवडे येथील दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असलेले आरोपी तब्बल दहा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप मोकाट आहेत. याला मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हेच पूर्णत: जबाबदार असल्याचा आराेप करण्यात आला. तसेच त्यांच्या काळात अनेक गुन्हे आर्थिक तडजोडीतून दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आम्ही ऐकतोय, अशा भ्रष्ट व बेजबाबदार पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी व्हावी. त्यांना निलंबित करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आज मरवडे येथे रास्ताराेका प्रसंगी केली आहे.

    मरवडे येथे आज सकाळी दहा वाजता शेकडाे नागरिक व महिलांच्या उपस्थितीत चव्हाण कुटुंबातील त्या दोन मृत्यू मुलींना न्याय मिळावा. मोकाट आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते आंदाेलकापुढे ते बाेलत हाेते.

    या आंदोलनात मरवडे गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आपला संतापजनक आक्रोश महिला व पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला.

    याप्रसंगी राष्ट्रवादीचे लतीफभाई तांबोळी, माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, प्रहारचे संतोष पवार, माणिक पवार, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय गणपाटील यांच्यासह आदींनी या मुलींना न्याय मिळावा, वेळ मारूपणा करणाऱ्या पोलिस प्रशासनाविरोधात आपली निराशजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

    प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, मंगळवेढा तालुक्यात अनेक गुन्हे वाढत आहेत. तीन दराेडे व दराेड्यातून खून अशा समाजविघातक घटना घडूनही पाेलिस निरीक्षक गुंजवटे बेफिकीर, बेजबाबदार वागत आहेत. दाेन वर्षात एकाही चाेरीचा तपास नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकार्‍यामुळे मंगळवेढा पोलीस खाते बदनाम होत आहे, अनेक गुन्हे आर्थिक तडजोडीतून मिटवली जात आहेत. त्यामुळे सामाजिक व्यवस्था बिघडत चालली आहे. अशा बेफिकीर अधिकाऱ्यावर कारवाई हाेणे गरजेचे आहे.