घरकुल प्रस्ताव फाईली गायब केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेनेचे बेमुदत उपोषण

  मोहोळ : मोहोळ शहरातील मागासवर्गीय नागरिकांसाठी रमाई घरकुल योजनेंतर्गत सन २०१९/२० मध्ये दिलेल्या घरकुल प्रस्ताव फाईली गायब केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी शिवसेना मोहोळ शहराच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

  रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रस्तावाच्या फाईली व्देषभावनेने मोहोळ नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गहाळ केल्या आहेत. त्याविरोधात शिवसेना मोहोळ शहर यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व लाभार्थ्यांच्या प्रस्ताव फाईलचा शोध घेऊन लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ द्यावा अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र प्रकारचे करू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

  यावेळी शिवसेना नगरसेविका सीमा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, शहर प्रमुख विक्रम देशमुख, नगरसेवक सत्यवान देशमुख, नगरसेवक सुशील क्षीरसागर, जिल्हा शिवसेना नेते दादासाहेब पवार, नगरसेवक महादेव गोडसे, नगरसेवक चंद्रकांत गोडसे, शांतिकुमार आष्टुळ, अशोक गायकवाड, शिवरत्न गायकवाड, नागेश मेजर क्षीरसागर, सतिश क्षीरसागर, विजय सरवदे, नागेश वनकळसे, गणेश गावडे, सोमनाथ पवार, बाळू क्षीरसागर आदी उपस्थित होते.

  असे आहे प्रकरण…

  मोहोळ नगरपरिषदेच्या वतीने सन २०१९/२० या कालावधी मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थी यांच्या एकूण १८९ पैकी २८ जणांचे फाईल कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्या फाईली राजकीय द्वेषापोटी आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने संबंधित व्यक्तीला लाभ न मिळू देण्याच्या हेतूने २८ फाईल यांची सर्व कागदपत्रे परिपूर्ण असताना देखील त्या सर्व फाईल गायब करण्यात आल्या असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे

  शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला राजकीय पक्ष न बघता मोहोळ नगरपरिषद, मोहोळ मधील प्रभाग क्र. १६ चा भाजप नगरसेवक व या शहराचा एक सुजाण नागरिक नात्याने ज्या सर्व लाभार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळावा म्हणून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे.

  – सुशीलकुमार क्षीरसागर, भाजप नगरसेवक, मोहोळ

  मागासवर्गीयांसाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत असताना मोहोळ नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने लाभार्थ्यांना लाभ मिळू नये या उद्देशाने फाईली गायब करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे. हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही. सर्व २८ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.

  – विजय सरवदे, आंदोलनकर्ते, मोहोळ