मोहोळ तालुक्यातील खवणीतील ‘टाळे ठोको आंदोलन’ ११ व्या दिवशी स्थगित

    मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खवणी येथील ग्रामसेवकाची बदली केल्याने ग्रामस्थांचे बेमुदत “टाळे ठोको आंदोलन” ११ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. ग्रामसेवक मिलिंद तांबिले हे गेली दोन महिने गैरहजर होते तर गावकामगार तलाठी मंगेश बनसोडे हे सात महिन्यापासून खवणी गावात आलेच नव्हते.

    कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करुन कोरोना-१९ संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण मोहीम राबवणे यामध्ये ग्रामसेवक व तलाठी यांचा कसलाही सहभाग नव्हता. शिवाय शेतकऱ्यांच्या वारसांच्या नोंदी, गट विभाजनाची कामे, पिकपाणी नोंदी खोळंबलेल्या आहेत. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे खाते पुस्तक, दैनंदिन जमाखर्च नोंद वही, नोटीस बुक, प्रोसिडिंग बुक व इतर ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायत सदस्यांना कामकाजासाठी आणि पाहायलाही देत नव्हते. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून खवणी गावांसाठी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला बेमुदत “टाळे ठोको आंदोलन” सुरु केले होते.

    याप्रकरणाची विस्तार अधिकारी बागवाले व अरुण वाघमोडे यांच्यामार्फत चौकशी होऊन त्यांनी ग्रामस्थ, ग्रामसेवक यांचा जबाब घेऊन सदरचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यामुळे मोहोळ तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी ग्रामसेवक मिलिंद तांबिले यांना सक्तीच्या रजेवर पाठवून खवणी गावचा पदभार दुसऱ्या ग्रामसेवकाकडे सोपविला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ” टाळे ठोको आंदोलन ” ११ व्या दिवशी स्थगित केले आहे.

    दरम्यान, गावकामगार तलाठी यांची महसूल प्रशासनाने बदली केली नसल्याने त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्हाला महसूल प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरुद्ध पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव संजीव खिलारे यांनी दिला आहे.

    यावेळी विस्ताराधिकारी अरुण वाघमोडे, पोलीस अधीक्षक गोपनीय शाखेचे रामेश्वर कोडक, सरपंच सौ. शीतल यमगर, ग्रा.पं.सदस्य सतीश खिलारे, ग्रा.प सदस्य सौ. रेखा भोसले, ग्रा.प सदस्य सौ सुरेखा भोसले, प्रा. सचिन भोसले, ज्योतीराम भोसले, देविदास भोसले, तानाजी खिलारे, सहदेव यमगर, प्रेम खिलारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.