कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे घेऊन निघालेला टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडला

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे घेऊन निघालेल्या आयशर टेम्पोला मोहोळ पोलिस पथकाने पकडले. त्या टेम्पोत ८ देशी गाई, १ म्हशीचे रेडकू, ६ मोठ्या जर्सी गाई व ५ खिलार गाई असा एकूण टेम्पोसह ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान कुरुल रोडवर करण्यात आली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांच्यासह पोलिस पथक रात्रीची गस्त घालत असताना ३१ डिसेंबरच्या पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कुरुलकडून मोहोळकडे निघालेला आयशर टेम्पो संशयास्पदरित्या येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सदरचा आयशर टेम्पो थांबवला असता त्या टेम्पोमध्ये जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने पोलिसांच्या पथकाने टेम्पोमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना त्या टेम्पोत ८ देशी गाई, १ म्हशीचे रेडकू, ६ मोठ्या जर्सी गाई व ५ खिलार गाईंना चारा पाण्याशिवाय निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.

    याप्रकरणी सरफराज रियाज तलफदार (रा.सिद्धार्थ नगर मोहोळ) व अफनान इब्राहीम कुरेशी (रा. विजापूर वेस सोलापूर) या दोघाजणांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये पो. कॉ. गणेश दळवी यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

    दोन लाख रुपयांचा टेम्पो व अडीच लाख रुपयांची जनावरे असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे.