बाजार समितीत आता ‘एक दुकान एक झाड’

सभापती आ. विजयकुमार देशमुख यांची संकल्पना; झाड जगविणार्‍या व्यापार्‍यांच्या परवान्याचे होणार नूतनीकरण

    सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ‘एक दुकान एक झाड’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. ज्या दुकानदारांनी झाड लाऊन जोपासले आहे, त्या दुकानदारांचेच व्यापारी परवाना नूतनीकरण केले जाणार आहे. ज्यांनी झाड लावले नाही किंवा त्याची जोपासना केली नाही त्यांचा परवाना नूतनीकरण यापुढील काळात केला जाणार नाही अशी अट घालण्यात आली आहे.

    ही अभिनव संकल्पना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आ. विजयकुमार देशमुख यांनी जाहीर केली आहे. बाजार समिती आवारात वृक्षाचे संवर्धन व्हावे, धुळीचे प्रमाण कमी व्हावे, शेतकरी, व्यापारी, अडत दुकानदार, हमाल-तोलार या वर्गांना ऑक्सिजन मिळावा या हेतूने ही संकल्पना राबविली जाणार आहे.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जवळपास १८०० परवानाधारक व्यापारी आहेत. एकूण दुकानाची संख्या १२०० आहे. या दुकानांमध्ये फळे भाजीपाला, कांदा, भुसार, मिरची, अडत दुकाने आहेत. प्रत्येक दुकानासमोर एक झाड लावण्याची अट घातली जाणार आहे. हे झाड केवळ फोटोपुरते न लावता या झाडाला जोपासण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. त्यासाठी बाजार समितीकडून हे झाड पुरविले जाणार आहे. या झाडाची व्यवस्थित वाढ व्हावी यासाठी बाजार समितीकडून गांडूळ खत दिले जाणार आहे. मात्र ज्यावेळी परवानाधारक दुकानदार बाजार समितीकडे परवाना नूतनीकरणासाठी येईल त्यावेळी त्यांना झाड जोपासल्याचा फोटो आणावा लागणार आहे. तेव्हाच संबंधित व्यापार्‍याचा परवाना नूतनीकरण केला जाणार आहे.यामुळे येणार्‍या काळात बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर वृक्षांची संख्या दिसून येणार आहे.

    वृक्ष जोपासण्याची जबाबदारी सर्वांची
    बाजार समिती आवारात मागील काही वर्षांपूर्वी रस्ता करताना रस्त्यामध्ये आलेली झाडे तोडण्यात आली होती. परंतु सध्याची स्थिती पाहता झाडांची गरज आहे. ही बाब लक्षात घेता बाजार समिती आवारात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावण्यात येणार आहेत. केवळ ही झाडे न लावता ती जोपासण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. ज्या दुकानदारांनी झाड जोपासले त्यांच्याच परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार असल्याची माहिती सभापती विजयकुमार देशमुख यांनी दिली.