पोलिस आयुक्‍तांचा पुन्हा एकदा झटका ; ८८ पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

विजयपूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बारवरील कारवाईनंतर सीसीटिव्हीचा डीव्हीआर गहाळ झाल्याने पोलिस आयुक्‍तांनी सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना निलंबित केले. सदर बझार पोलिस ठाण्यातील एक कर्मचाऱ्याला लाचलुचपतने पकडल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना मुख्यालयात घेतले.

    सोलापूर :  काही वर्षांपासून एकाच खुर्चीवर तथा एकाच ठिकाणी ड्यूटी करणाऱ्या पोलिस हवालदार,पोलिस नाईक,पोलिस शिपायांच्या अंतर्गत बदलीचे आदेश सोमवारी पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी काढले.पोलिस उपनिरीक्षक संदिप शिंदे यांच्यासह एकूण ८८ जणांच्या अंतर्गत बदल्या करून पोलिस आयुक्‍तांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे.शहर वाहतूक शाखा दक्षिण व उत्तर विभाग, मुख्यालय,नियंत्रण कक्ष,सदर बझार पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे,फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसह विशेष शाखा व परवाना शाखा,जलद प्रतिसाद पथकातील काही कर्मचाऱ्यांचीही बदली केली.काही दिवसांपूर्वी सदर बझार पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला होता.त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांना नियंत्रण कक्षात आणले.आता सदर बझार पोलिस ठाण्यातील बहुतेक कर्मचाऱ्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात ड्यूटी देण्यात आली आहे.तर एमआयडीसी पोलिस ठाण्यासह मुख्यालयातील अनेकांना शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यालयातील काहींना सदर बझार पोलिस ठाण्यात ड्यूटी दिली आहे.अंतर्गत बदल्या झालेल्यांमध्ये २७ कर्मचारी वाहतूक शाखेचे असून २८ कर्मचारी मुख्यालयातील आहेत.आठ पोलिस कर्मचारी सदर बझारचे आहेत.दरम्यान,गुन्हे शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक संदिप शिंदे यांना काही दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात आणले होते.त्यांना आता पुन्हा गुन्हे शाखेची जबाबदारी दिली आहे.

    पोलिस दलातील अपप्रवृत्तींवरही वॉच

    विजयपूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बारवरील कारवाईनंतर सीसीटिव्हीचा डीव्हीआर गहाळ झाल्याने पोलिस आयुक्‍तांनी सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना निलंबित केले. सदर बझार पोलिस ठाण्यातील एक कर्मचाऱ्याला लाचलुचपतने पकडल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना मुख्यालयात घेतले.आता काही पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना इतरत्र बदली दिली आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवताना गैरप्रकाराला थारा मिळू नये,याची पुरेपूर काळजी त्यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून घेतली आहे. गुन्हे शाखा,डीबी पथक,पोलिस चौकी,पोलिस ठाणे, सहायक पोलिस आयुक्‍त,परिमंडळ पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशी यंत्रणा असतानाही त्यांनी विशेष पथक नेमले.अवैध व्यवसायिकांबरोबरच पोलिस दलातील अपप्रवृत्तींवरही वॉच हे पथक ठेवत आहे.