…तर ध्वजारोहणास अर्धनग्न उपस्थित राहणार; राष्ट्रवादीच्या गवळींचा इशारा

रस्ता करायचाच नव्हता तर वृक्षतोड केलीच कशाला? संबंधित ठेकेदारावर गुन्हा का दाखल करु नये? पंढरपूर-कुर्डुवाडी रस्ता महामार्गावरील कुर्डुवाडी हद्दीतील पूल व राजमाता अहिल्यादेवी चौकापर्यंतचा प्रस्तावित रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरु न झाल्यास निषेध करणार.

    कुर्डुवाडी : रस्ता करायचाच नव्हता तर वृक्षतोड केलीच कशाला? संबंधित ठेकेदारावर गुन्हा का दाखल करु नये? पंढरपूर-कुर्डुवाडी रस्ता महामार्गावरील कुर्डुवाडी हद्दीतील पूल व राजमाता अहिल्यादेवी चौकापर्यंतचा प्रस्तावित रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरु न झाल्यास पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणास अर्धनग्न उपस्थित राहून निषेध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

    गवळी यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावर संपूर्ण काम झाले आहे. परंतु, कुर्डुवाडी हद्दीतील सर्वात मोठा ओढा यावरील दोन २१ मीटर पूल व गावातील राजमाता अहिल्याबाई चौकापर्यंतचा रस्ता आपल्याकडे प्रस्तावित असलेले पत्र मला दिले आहे. हा रस्ता पुढच्या महिन्यात चालू करतो. ठेकेदारास फोन लावतो, असे आपण तोंडी सांगून याला दीड महिना झाला तरी कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. आपल्याकडील ठेकेदारांनी ५० वर्षांहून जुनी रस्त्याच्याकडेच्या लिंबाची, चिंचेची अशा अनेक वृक्षांची वृक्षतोड केली आहे.

    येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहणास माझ्यासह युवासेनेचे अतुल फरतडे, रिपाइं (आ) गटाचे शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर व्हनमाने हे कोरोनाचे सर्व नियम पाळून अर्धनग्न अवस्थेत ध्वजारोहणास हजर राहून निषेध करणार आहोत, याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.