लग्नकार्य आटोपून परतत असताना अपघात; उपचारादरम्यान दुचाकीचालकाचा मृत्यू

सांगोला येथून लग्नकार्य आटोपून पेनुरकडे येत असलेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक झाली. त्यात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान पंढरपूर येथे मृत्यू झाला.

    मोहोळ : सांगोला येथून लग्नकार्य आटोपून पेनुरकडे येत असलेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक झाली. त्यात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान पंढरपूर येथे मृत्यू झाला. ही घटना रात्री आठच्यादरम्यान पेनुर गावच्या हद्दीत पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर झाली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील बांधकामावर मजुरीने काम करणारे खंडू नागनाथ गोडसे (वय ३२) हे पेनुर येथे बहिणीला भेटण्यासाठी आले होते. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान (एमएच १३, डी.के. ३३६७) या दुचाकीवरून गोडसे हे तुंगतकडे निघाले असता पेनुर गावच्या हद्दीतील आडगावकर वस्ती जवळ सांगोल्याऊन पंढरपूर मार्गे पेनुरकडे येणाऱ्या (एमएच. १४, जे.आर. ६२३२) या एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये खंडू गोडसे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

    उपचारादरम्यान त्यांचा पंढरपूर येथे मृत्यू झाला असून, या अपघाताची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चालकाविरोधात मोहोळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.