सिम कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली महिला डॉक्टरला घातला ४६ हजाराला गंडा

    सोलापूर : सिम कार्ड व्हेरिफिकेशन पेंडिग राहिले आहे, असा मेसेज अज्ञात व्यक्तीने पाठवून महिला डॉक्टरला ४६ हजार १९५ रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून फसवणूक केल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी डॉक्टर मीरा बाबुराव तीर्थकर (वय ३२,रा.शिवाजी नगर,बाळे सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी डॉक्टर मीरा तीर्थकर यांना जिओ कंपनीचे सिम कार्ड व्हेरिफिकेशन करणे पेंडिंग राहिला आहे, असा मेसेज पाठवून क्युएस ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीकडून जिओ ॲपवर दहा रुपयांचा रिचार्ज करून, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बाळीवेस येथील फिर्यादी डॉक्टर मीरा तीर्थकर यांच्या बचत खात्यामधून ४६ हजार १९५ रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून फिर्यादीची फसवणूक केली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.