सोलापूरात बेरोजगार अभियंत्यांनी गोट्या खेळून केला मोदी सरकारचा निषेध

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी त्यांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रामहरी रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तसेच बेरोजगार युवकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गोट्या खेळून मोदी सरकारचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.

  यावेळी बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगार व अनेक खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, नोटबंदी, GST ची अपयशी आणि चुकीची अंमलबजावणी, सरकारी कंपन्या आपल्या बगलबच्चा उद्योगपतींना विकण्याचे धोरणामुळे या सात वर्षात कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत. लाखो छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या सर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे चुकीचे धोरणे कारणीभूत आहेत.

  आईवडील आपल्या मुलांचे चांगल्या भविष्याचे स्वप्न बघून कर्जे काढून मुलांना चांगले शिक्षण देतात. या सुशिक्षित युवकांना मोदी सरकारचे मंत्री निर्लज्जपणे पकोडे विका म्हणून बेजबाबदारपणे सल्ला देतात. म्हणून कोट्यवधी युवकांना बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी, बेरोजगार युवकांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त हल्लाबोल आंदोलन तसेच बेरोजगार युवकांच्या वतीने बेरोजगारीचे प्रदर्शन करत गोट्या खेळून निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.

  यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले असून, त्याचा आज बेरोजगार दिवसनिमित्त तसेच नरेंद्र मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.

  या आंदोलनात सोलापूर शहर कॉंग्रेस अभियंता सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, सुशिक्षित अभियंते आकाश कांबळे, सागर शिंदे, विक्रम गाडीकर, रितेश कोकणे, अलीम अन्सारी सहभागी झाले.

  यावेळी कार्याध्यक्ष युवराज जाधव, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष योगश मार्गम, राहुल वर्धा, प्रविण जाधव, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, अभिराज शिंदे, संजय गायकवाड, गोविंद कांबळे, निलेश व्हटकर, रवी शिंदे, किरण राठोड, सुभाष वाघमारे, जावेद कुरेशी, राजेंद्र शिरकुल, गणेश वाघमारे, मनोहर माचर्ला, गणेश इंगळे, शिवराज कोरे, विकास कांबळे, शशी शेळके, इरफान शेख, सागर व्होटकर, रोहित पाटील, यांच्यासह इतर बेरोजगार युवक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.