उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने वडार समाज आक्रमक; सुरु केलं दगडफोड आंदोलन

    अकलूज : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आणि अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ दिवसांपासून अकलूज प्रांत कार्यालयासमोर अकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी साखळी उपोषण सुरु आहे. तरीही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने माळशिरस तालुका वडार समाजाच्या वतीने उपोषणस्थळी दगडफोड आंदोलन करण्यात आले.

    उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील उपोषणास बसल्यानंतर माळशिरस तालुका वडार समाजाच्या वतीने या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी बोलताना गणेश देवकर म्हणाले की, आमची अकलूज नगरपरिषद व्हावी, ही कायदेशीर मागणी आहे. तरीही यात राजकारण आणून उपमुख्यमंत्री अजित पवार अकलूज नगरपरिषद जाणीवपूर्वक होऊ देत नाहीत.

    अकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी सलग नऊ दिवस झाले आमचे साखळी उपोषण सुरू आहे. तरीही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने आता आम्ही उपोषणाच्या ठिकाणी दगडफोड आंदोलन केले आहे. मात्र, अकलूज नगरपरिषदेबाबत लवकर निर्णय न झाल्यास आम्ही वडार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करणार असा इशारा यावेळी गणेश देवकर यांनी दिला आहे.

    चंदू काळे, पिंटु चौगुले, दिलीप पवार, सोमनाथ पवार, दीपक माने, विशाल काळे, बजरंग काळे, संजय काळे, चंद्रकांत पवार, तेजस पवार, शिवा काळे, आकाश काळे, अजय पवार, सूरज काळे, अमर पवार, विजय काळे हे यावेळी उपस्थित होते.