सोलापूरच्या पालकमंत्र्यांकडून हप्ते वसुलीचा कार्यक्रम; भाजपच्या श्रीकांत देशमुख यांचा आरोप

  अकलूज : सोलापूरचे पालकमंत्री कोणत्याही कामाचे नाहीत. त्यांनी फक्त हप्ते वसुलीचा कार्यक्रम लावला आहे. अकलूजच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तरी त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. दोन दिवसात त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्यास त्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला.

  अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्यावतीने येथील  प्रांताधिकारी कार्यालयासमोर अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे या मागणीसाठी सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असून, लोकभावना तीव्र होत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज श्रीकांत देशमुख आले असता त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून सरकारवर टीका केली.

  ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सध्या सर्व स्तरात खालच्या पातळीवरील राजकारण करताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा सदैव झोपेत असतात. अचानक कधीही येतात आणि कधीही जातात. त्यांच्याशेजारी अकलूज येथे साखळी उपोषण सुरू असताना देखील ते भेट द्यायला आले नाहीत. ते दोन दिवसात जर भेट द्यायला नाही आले तर त्यांना घेराव तर घालूच. पण त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा श्रीकांत देशमुख यांनी दिला.

  तसेच विजयदादा बांधकाममंत्री असताना त्यांनी कधी विकासांत राजकरण केले नाही. भरणेमामा सोलापूरचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याचे वाटोळे झाले. जर का भाजपचा मुंख्यमंत्री असता तर काका-पुतण्या औषधाला पण ठेवले नसते. पालकमंत्री यांनी राज्य सरकारच्या कानावर घालायला पाहिजे होते. सोलापूर जिल्ह्यात विकास करण्यापेक्षा राजकारण करण्याचे काम बारामतीकर करत आहेत.

  दरम्यान, उपोषणस्थळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील, जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील, दत्तात्रय भिलारे, मोहन लोंढे यांनी भेट दिली.

  आजच्या उपोषणात अकलूजच्या सरपंच पायल मोरे, ग्रा.पं.सदस्या शितलदेवी माने पाटील, संग्रामनगरचे सरपंच कमाल शेख, कुमारी इशिता धैर्यशील मोहिते पाटील, माजी सरपंच दादासाहेब मोरे, भाजप अल्प संख्याक सेलचे मूक्तार कोरबू, शहराध्यक्ष महादेव कावळे, भैया माढेकर, नाजिम खान, रफिक तांबोळी, राहुल जाधव, सतिशराव माने पाटील, रफिक पठाण, वैष्णवी दोरकर, रेश्मा गायकवाड, सुभद्रा वाईकर, हर्षाली निंबाळकर, फतिमा पाटावाला, वसुंधरा देवडीकर, मानव सरंक्षण समिती दिल्लीचे जन संपर्क अधिकारी जी एम भगत,  बागवान मोहल्ला, काझी गल्ली, गुरुनगर, अकलाईनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गुरूनगर गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, अकलाई गणेश मंडळ, भाजपा अल्पसंख्याक सेल, भाजपा अनुसूचित मोर्चा सेलच्या वतीने निवेदन देण्यात आले.