गाव करणार सुजलाम सुफलाम : सरपंच रेवती कुंजीर

  माळशिरस : येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीचे भव्य दिव्य असे ग्रामसचिवालय उभारण्यात येणार असून अंतर्गत सिमेंट रस्ते, सिंगल फेज वीजपुरवठा,गटार लाईन तसेच सर्व पायाभूत सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार असून वाघापूर हे सुजलाम सुफलाम करणार आहे,असा निर्धार वाघापूरचे सरंपच रेवती कुंजीर यांनी केला आहे.

  पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणारे एक छोटेसे पण नावाजलेले व शैक्षणिक वारसा लाभलेले वाघापूर गाव. शिक्षण क्षेत्राला सर्वात जास्त शिक्षक या गावाने दिले आहेत. सन  २०२१ मध्ये या गावची सार्वत्रिक निवडणूक होऊन या ग्रामपंचायतीचा कारभार गावच्या सरपंच रेवती कुंजीर यांच्या हाती आला.

  सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे, घनकचरा नियोजन, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, शिक्षण सुविधा, दळणवळण साधने, निर्मिती करणे तसेच महिलांचे सबलीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे असा ग्रामपंचायतीचा मानस आहे.

  २५० झाडांचे वृक्षारोपण

  सर्व ठिकाणी निसर्गाची हानी होत असताना आपणही निसर्गाचे काही देणे लागतो या दृष्टिकोनातून जवळपास २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. फक्त झाडे लावणे महत्त्वाचे नसून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. या भावनेतून व सर्व नागरिकांच्या सहकार्यातून सर्व झाडांना खत पुरवठा व ठिबक सिंचन करून सर्व झाडांचे संगोपन करण्यात आले.

  गावातील तरुणांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी गावात मोठे मैदान तयार करण्यात आले. तसेच ग्रामस्थांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी,यासाठी त्याच मैदानाच्या बाजूने व्यायामासाठी लवकरच ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.

  कोरोनाला हद्दपार करणार

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गावात ३० बेडचे सुसज्ज असे विलगीकरण कक्ष उभारून गावापासून कोरोनाला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. येणाऱ्या काळात गावामध्ये कोरोणाचा शिरकाव होणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे.

  – सौरभ कुंजीर, उपसरपंच

  (शब्दांकन : मंगेश गायकवाड)