विमानात पुन्हा राडा! एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाला धुम्रपान करताना अटक

लंडन-मुंबई फ्लाइटची घटना एअर इंडियाने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही वर्तनासाठी 'शून्य सहनशीलता धोरण' अवलंबल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासुन विमानात प्रवासादरम्यान प्रवाशाकंडुन काही ना काही गैरप्रकार करण्याच्या बातम्या समोर येत आहे. काही दिवसापुर्वी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं महिला सहप्रवासीवर लघुशंका केल्याची घटना घडली होती. आता एअर इंडियाच्या लंडन-मुंबई (London Mumbai) विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगारेट ओढताना पकडण्यात(Smoking In Flight) आले आहे. फायर अलार्म वाजला तेव्हा फ्लाइट स्टाफने प्रवाशाला पकडले तेव्हा त्याने चांगलाच गोंधळ घातला आणि विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आरोपीचं नाव रमाकांत (वय,37) असुन याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना 10 मार्चला घडल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रवासी भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, इशारा देऊनही आरोपी रमाकांतने अनियंत्रित आणि आक्रमकपणे वर्तन केले. विमान मुंबईत उतरल्यावर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. एअर इंडियाने म्हटले आहे की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही वर्तनासाठी ते ‘शून्य सहनशीलता धोरण’ अवलंबते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाकांतविरुद्ध गैरवर्तन, इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे आणि पायलट-इन-कमांडच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्यास नकार दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि धूम्रपान बंदीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांचाही सामना करावा लागतो.