सुरक्षारक्षकाकडून प्रवाशाला मारहाण, पनवेल एसटी आगारातील घटना

पनवेल एसटी आगारात येण्यासाठी उशीर झाल्याने आणि कर्जत येथे जाणारी शेवटची एसटी निघून गेल्याने त्यांनी पहाटेच्या एसटीने जाण्याचा निर्णय घेतला.

    पनवेल, ग्रामीण : रात्री उशिरा एसटी आगारात का थांबली आहे असे विचारत एका सुरक्षारक्षकाने एसटी प्रवशाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ( ता.27) पनवेल एसटी आगारात घडली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका येथील रहिवाशी असलेले नवनाथ आडे हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. शुक्रवारी ते आळंदी येथून रायगड जिल्यातील कर्जत येथे काही कामा निमित्त जात होते. यावेळी त्यांनी पनवेल एसटी आगारातून कर्जत पर्यतचा प्रवास एसटीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र पनवेल एसटी आगारात येण्यासाठी उशीर झाल्याने आणि कर्जत येथे जाणारी शेवटची एसटी निघून गेल्याने त्यांनी पहाटेच्या एसटीने जाण्याचा निर्णय घेतला.

    यावेळी ते आगारातील एका कोपऱ्यात विसावाले असताना आगारात ड्युटीवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. यावेळी झालेल्या बाचाबाची नंतर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने आडे यांना मारहाण केल्याने आडे यांनी 112 या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनतर नियंत्रण कक्षास कळवल्याने स्थानिक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी एसटी आगार गाठून आडे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्याचप्रमाणे पुढील कार्यवाही करता पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र स्थानिक पोलीस ठाणे माहिती नसल्याने आडे यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली नसली तरी एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशाला अशाप्रकारे मारहाण करणे किती योग्य आहे असा सवाल आडे यांनी उपस्थित केला आहे.