इंडिगो विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका; 182 प्रवासी ताटकळले, पावणेसात तास ना जेवण, ना नाष्टा

चिकलठाणा येथील विमानतळावरुन मुंबईला रवाना होणारे विमान बिघडल्याने त्यातील 182 प्रवाशांना पावणेसात तास ताटकळत बसावे लागले. यानंतर रात्री एक वाजता दुसरे विमान आल्यावर प्रवाशांना रवाना करण्यात आले.

    छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील विमानतळावरुन मुंबईला रवाना होणारे विमान बिघडल्याने त्यातील 182 प्रवाशांना पावणेसात तास ताटकळत बसावे लागले. यानंतर रात्री एक वाजता दुसरे विमान आल्यावर प्रवाशांना रवाना करण्यात आले.

    सुरक्षेची तपासणी केल्यावर प्रवाशांना विमानतळ हॉलमध्ये बसवण्यात आले होते. हा प्रवास ५५ मिनिटांचाच असल्याने प्रवाशांनी जेवण सोबत आणले नव्हते. तसेच विमानतळावर कोणत्याही खाद्यपदार्थाची सोय नसल्याने प्रवाशांना तसेच उपाशी रहावे लागले.

    मुंबईहून सायंकाळी पावणेसात वाजता इंडिगोच्या विमानाचे एक तास उशिरा आगमन झाले. परतीच्या प्रवासाआधी विमानात तांत्रिक बिघाड झाला. ही बाब पायलटच्या लक्षात आल्यावर त्याचे उड्डाण थांबविण्यात आले.

    याआधी 11 डिसेंबर रोजी इंडिगो विमानाचे पार्किंग ब्रेक जॅम झाले होते. या विमानास टो करुन पुन्हा परत आणण्यात आले होते. परिणामी, प्रवाशांना सहा तास पोहोचण्यास उशीर झाला होता. तसेच विमानतळावर कोणत्याही खाद्य पदार्थाची सोय नसल्याने प्रवाशांना उपाशी रहावे लागले.