रेल्वेचे वेळापत्रकच कोलमडल्याने प्रवासी त्रस्त; अनेक सुपरफास्ट गाड्याही धावताहेत उशिराने, प्रवाशांनी रेल्वेलाच दिला इशारा…

नागपूर-रायपूर ते रायपूर-नागपूर मार्गे धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (Superfast Express), लोकल (Local Train) अशा सर्वच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे दीडशेच्या वर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले.

    हिंगोली : नागपूर-रायपूर ते रायपूर-नागपूर मार्गे धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (Superfast Express), लोकल (Local Train) अशा सर्वच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे दीडशेच्या वर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. प्रवासीगाड्या उशिरा चालवू नका, म्हणून साकडे घातले. पुढेही असाच प्रकार सुरू राहिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.

    हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मागील पाच-सहा महिन्यांपासून पूर्णतः बिघडले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, सुपर फास्ट, लोकल पॅसेंजर गाड्या तास – तास उशिरा धावत आहेत. नॉन इंटरलॉकिंग आणि अन्य काही कारणे देऊन रेल्वेचा प्रवाशांना त्रास देण्याचा हा प्रकार सुरू आहे. आझाद हिंद एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद लोकल इंटरसिटी एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेस, गोंडवाना एक्स्प्रेस यांसह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत आहेत.

    काही गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत. तर मालगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या प्रवासी गाड्या गोदामाजवळ उभ्या केल्या जात आहेत.

    पाच ते सहा मालगाड्या समोर सोडल्याशिवाय प्रवासी गाड्यांना हिरवा कंदील दिला जात नाही. त्यामुळे भंडारा व तुमसर रोड रेल्वेस्थानकावर रात्रीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. रेल्वेची वाट पाहून प्रवासी प्रचंड वैतागून गेले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नित्याच्याच झालेल्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.