भीमा पाटस कारखान्याच्या चालू वार्षिक अहवालाची पाटस ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली होळी

सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो न छापल्याने संताप

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व अहवाल सभासदांना वाटप करण्यात आली आहे. मात्र या अहवालामध्ये भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी स्वर्गीय मधुकरराव गंगाजीराव शितोळे यांचे नाव व फोटो न छापल्याने पाटस ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या अहवालावर तीव्र आक्षेप घेत या अहवलाची ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी ( दि.२५) होळी करून निषेध व्यक्त केला.
    भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दिनांक- २९ संप्टेबर २०२३ रोजी) दुपारी एक वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेली आहे.
    मात्र भीमा पाटस कारखान्याच्या सर्व साधारण सभेच्या अगोदरच भीमा पाटस कारखान्याचे संचालक मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भीमा पाटस कारखान्याच्या संचालक मंडळांनी प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवालातुन पाटसचे भूमिपुत्र दौंड तालुक्याचे भाग्य विधाते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. मधुकरराव शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वगळला आहे. भीमा पाटसच्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या या कृतीचा पाटस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निषेध सभा घेऊन व काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्व. मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या वार्षिक अहवालाची होळी करून निषेध करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष आमदार कुल व संचालक मंडळाला स्व.मधुकरराव शितोळे यांचा विसर पडला आहे. त्यांनी ४१ व्या वार्षिक अहवाल (सन २०२२/२०२३) सादर करत असताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. मधुकाका शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वार्षिक अहवालावर जाणीवपूर्वक छापण्यात आला नाही, हे कृत्य अतिशय निंदनीय असून हा प्रकार खोडसाळपणाचा आहे. हे कृत्य कारखाना प्रशासनाने जाणीवपूर्वक केलेला आहे.असा आरोप पाटस ग्रामपंचायत प्रशासन व काही ग्रामस्थांनी केला. यापूर्वी प्रत्येक वार्षिक अहवालात स्व. मधुकराव शितोळे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे.

    मात्र, कारखान्यांचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व सर्व संचालक मंडळाने सन २०२२/२०२३ च्या वार्षिक अहवालामध्ये जाणीव पूर्वक कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी कै. मधुकरराव शितोळे यांना डावलले आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी प्रसिद्ध केलेला अहवाल माघारी घेवून नव्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी स्व. मधुकरराव शितोळे यांचे नाव व छायाचित्रासह पुन्हा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा व या कृतीबाबत सर्व सभासद, कामगार व ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी यावेळी केली. सरपंच रंजना पोळेकर, उपसरपंच राजवर्धन शितोळे, ग्रामपंचायत सदस्या अवंतिका शितोळे, शितल चव्हाण, सायराबानु शेख, इंदुमती शितोळे, राजू शिंदे, भूषण पानसरे, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे, संभाजी चव्हाण,शिवाजी ढमाले, धनंजय भागवत, अमोल शितोळे, संदीप पोळेकर, अभिजीत शितोळे, चंद्रकांत भागवत, सागर शितोळे आदींसह कारखान्याचे काही सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय समोर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.