किवळे- कोरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था; रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा स्थानिकांचा इशारा

सार्वजनिक बांधकाम खाते फक्त ठेकेदारांच्या भल्यासाठीच जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतेय काय?, असा संतप्त सवाल कोरेगाव येथील युवकांकडून विचारला जात आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही तरुणांनी दिला आहे.

  चाकण : किवळे – कोरेगाव रस्ता तयार झाल्यापासून गेल्या दिड वर्षात १० वेळा खड्डे बुजविण्यात आले, पण परिस्थिती आहे तशीच आहे. खडी डांबर याचे प्रमाण कमी, रोलिंग व्यवस्थित नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष यामुळे  या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते फक्त ठेकेदारांच्या भल्यासाठीच जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतेय काय?, असा संतप्त सवाल कोरेगाव येथील युवकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही या तरुणांनी दिला आहे.

  खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अशक्य

  किवळे ते कोरेगाव हा रस्ता चाकण औद्योगिक वसाहतीकडे जवळचा मार्ग असल्याने कामगार वर्ग तसेच  परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, खाजगी वाहने यांची कायमच या रस्त्यावर वर्दळ असते. दुचाकी चालकांना तर मोठी कसरत करतच हा रस्ता पार करावा लागतो. कारण खड्डे चुकवता चुकवता, दुचाकी बिघडणे, बंद पडणे, मणक्याचा त्रास अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम सुरू झाले त्यावेळी या परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. पण ते समाधान दोन महिने सुद्धा टिकले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

  या रस्त्याची कायमच दुरवस्था आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते, त्या परिसरातील रस्ते वारंवार दुरुस्त करण्यापेक्षा एकदाच पण दर्जेदार झाले तरच ग्रामीण भागातील जनतेचा त्रास कमी होईल.

  - सिताराम सखाराम लवंगे, कोरेगाव

  या रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी मुरुम आणि खडीने बुजविण्यात आले होते. परंतु, जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने ते टिकाऊ होऊ शकले नाही. पाऊस उघडल्यानंतर या रस्त्यावरील सर्व खड्डे तत्काळ डांबर आणि खडीने बुजविण्यात येतील.

  - मधुकर भिंगारदिवे, उप विभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड)