Uddhav Thackeray

आज ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रातून निशाना साधला आहे. “रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत आणि त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा”. असं आज सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

  मुंबई – सध्या आरोग्ययंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंन्टिलेटरवर आहे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अनेक शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा यामुळं रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातील (Nanded Hospital Death Case) ३४ रुग्णांची मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे, यावर आज ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रातून निशाना साधला आहे. “रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत आणि त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा”. असं आज सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

  महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली

  दरम्यान, या सरकारमध्ये जराशीही माणुसकी व लोकभावनेची चाड उरली असेल तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाने केली. तसेच मिंध्यांकडे एवढी तरी नीतिमत्ता उरली आहे काय? असा सवाल केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बुधवारी (४ ऑक्टोबर) ही टीका करण्यात आली. ठाकरे गटाने म्हटलं, “महाराष्ट्रात सरकार नावाची चीज शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी मृत्यूकांडे महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे सत्रच सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यात आणि आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरात जे भयंकर रुग्णकांड झाले, ते अत्यंत वेदनादायक व संतापजनक आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य, असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली झुकली आहे.” असं सामनातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  किड्या-मुंग्यासारखे लोकं मरताहेत

  “महाराष्ट्रात निपजलेल्या सत्तापिपासू मिंध्यांच्या गलथानपणामुळे किडे-मुंग्या मराव्यात त्या पद्धतीने सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे तांडव सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा अचानक मृत्यू झाला. त्या घटनेची चौकशी होत नाही, तोच मागील दोन दिवसांत मराठवाड्यात ५३ रुग्णांचा शासकीय रुग्णालयांमध्ये बळी गेला. होय, हे बळीच आहेत! याला नैसर्गिक मृत्यू म्हणताच येणार नाही,” असा सवाल सामनातून उपस्थित केला आहे.

  घटनाबाह्य सरकारला याचा जाब द्यावाच लागेल

  सोमवारी २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदेड रुग्णालयात आणखी ११ जणांचा व छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही मंगळवारी १८ जणांचा बळी गेला. नांदेडमध्ये तर ज्या मुलांनी अजून हे जगही पाहिले नाही अशा १६ कोवळ्या कच्च्याबच्च्यांना काही कळण्याआधीच या जगाचा निरोप घ्यावा लागला. कोण आहे या मृत्यूंना जबाबदार? राज्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे सोडून २४ तास मलईच्या मागे धावणाऱ्या राज्यातील घटनाबाह्य सरकारला याचा जाब द्यावाच लागेल. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्यू वाढत आहेत हे ठाण्याच्या घटनेनंतर निदर्शनास येऊनही सरकार झोपा काढत राहिले, असं आज सामना अग्रेलखात म्हटलं आहे.