लिपिक, टंकलेखक पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा; रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अराजपत्रित गट ब आणि क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भातील पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या दालनांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आमदार रोहित पवार यांनी सदरील परीक्षा राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यासाठी मागणी लावून धरली होती.

    अखेर आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या नियमित पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच ही पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत प्रक्रिया सुरु होईल. यामुळे या पदांच्या भरतीकडे लक्ष असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    ही सर्व पदे राज्यसेवा आयोगामार्फत भरण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच आयोगाचे अध्यक्ष आणि कर्मचारी यांचे आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात नियमितपणे घेतलेल्या बैठका तसेच वेळोवेळी अधिकारी वर्गाला केलेल्या सूचना आणि निर्देश यामुळे हा विषय मार्गी लागण्यास गती मिळाल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले .

    यापूर्वी काही विभागांच्या परिक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल, असा विश्वास देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.