शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती, त्यांचा गट शून्य होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

    सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो शरद पवार यांना मान्य आहे का? असा सवाल केला.

    बावनकुळे म्हणाले, साताऱ्यात बुथ कमिटीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा एकही उमेदवार नाही. या उलट दरवर्षाला पंतप्रधान बदलायचा असा ते विचार करतात. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानपदापर्यंत जाण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, ते जमले नाही. त्यांचे नाव पंतप्रधान मोदींबरोबर कशासाठी जोडले जाते हेच कळत नाही. आताच्या निवडणुकीत पवार गटाचे सर्व उमेदवार हे पराभूत होणार आहेत.

    त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे का?

    महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक केली तर महाराष्ट्रात संघर्ष करु असा इशारा पवार यांनी दिल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला असता बावनकुळे म्हणाले, त्यांनी संषर्घ केला तरी जनता हे मान्य करणार नाही. कारण, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पवार यांना मान्य आहे का?, पवार यांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे का? असा सवाल केला. तर शरद पवार यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रशियाचे पुतीन अशी टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे म्हणाले, कुठे मोदी आणि कुठे पवार. त्यांची केवीलवाणी स्थिती झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.