सांगलीची उमेदवारी मागे घेण्यासाठी १०० कोटी द्या – नितेश राणे

निवडणूक हाच उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे.

    उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत ते सांगलीला असल्याचे चित्र दाखविले जात आहे. मात्र, सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेतो. आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्री वरून काँग्रेसला देण्यात आला आहे. ही माहितीच काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे. संजय राऊत काँग्रेसला झुकविण्यासाठी सांगलीला आहे की १०० कोटी साठी? हे खरं आहे की खोट याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी, असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले.

    निवडणूक हाच उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली, की महाविकास आघाडीत वसुली होत होती आणि आज त्याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. फडणवीस साहेबांना कुठल्याही उपचाराची गरज नाही. उलट तुझ्या मालकाला व त्याच्या मुलाला वेडे होण्याची पाळी फडणवीस साहेबांनी आणली आहे. त्यामुळे त्यांना आग्राच्या मेंटल हॉस्पिटलला पाठवा व महाराष्ट्र कायमचा उद्धव ठाकरे मुक्त करा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

    नरेंद्र मोदी जागतिक नेते आहेत. विश्व पुरुष आहेत. मातोश्री पुरते असलेले उद्धव ठाकरे यांची तुलना त्याचे सोबत होऊ शकत नाही. ती हिम्मत संजय राऊतने करू नये, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.