
टॅक्सी म्हटलं की ओला, उबरचे (OLA, Uber) नाव समोर येते. माफक दरात आणि अगदी आरामदायी असा प्रवास या सेवांच्या माध्यमातून करता येतो. जेव्हा आपण राईड रद्द (Ride Cancel) करतो तेव्हा आपल्याला दंड आकारला जातो.
मुंबई : टॅक्सी म्हटलं की ओला, उबरचे (OLA, Uber) नाव समोर येते. माफक दरात आणि अगदी आरामदायी असा प्रवास या सेवांच्या माध्यमातून करता येतो. जेव्हा आपण राईड रद्द (Ride Cancel) करतो तेव्हा आपल्याला दंड आकारला जातो. पण कॅब चालकाने राईड रद्द केली की आपल्याला नाहक त्रास व्हायचा. मात्र, आता कॅब चालकाने राईड रद्द केली तर दंडाची रक्कम ग्राहकांना मिळणार आहे.
ओला आणि उबर या सेवा नेमक्या कोणत्या नियमांखाली सुरू आहेत आणि त्या ग्राहकाभिमुख धोरणे राबवतात का, याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते.
उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर राज्य सरकारने एक समिती नेमून महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली बनविली आहे. ही नियमावली राज्य परिवहन आयुक्तालयाकडून लवकरच राज्य सरकारला सादर केली जाणार आहे. सरकारच्या मान्यतेनंतर ती तत्काळ अंमलात येईल, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
नेहमीच्या टॅक्सीपेक्षा ओला उबरकडून चार ते पाचपट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आळा घालण्यासाठी कमाल भाडेदर ठरविण्यात येणार आहे. याशिवाय, पिकअप लोकेशनवर पोहोचण्यास उशीर झाल्यास चालकाला दंड होणार असल्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. ओला, उबरकडे कॅब बुक करूनही एखाद्या चालकाने भाडे नाकारल्यास त्याला 50 ते 75 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.