खड्डा घ्या आणि खड्ड्यात जा! मंडप उभारणीवेळी रस्त्यावर खड्डे पाडलेले असल्यास होणार दंड; पालिकेकडून होणार नवरात्रौत्सव मंडळांची तपासणी

  मुंबई : यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात पार पडला. मात्र रस्ते आणि पदपथांना खड्डे केल्या प्रकरणी पालिकेच्या ई विभागाकडून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)) सुमारे साडेतीन लाखाचा दंड (Penalty) ठोठावला आहे. त्यामुळे पालिकेने नवरात्रौत्सवात मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे (Potholes) पाडू नये. तसेच मंडपाच्या अवती भवती देखील रस्ते आणि पदपथावर खड्डे पडणार याची खबरदारी घ्या असे आवाहन पालिकेकडून (BMC) करण्यात आले आहे.

  मंडप तपासणीच्या वेळी रस्ता वा पदपथावर खड्डा आढळून आल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी २ हजार रुपये दंड त्या नवरात्रौत्सव मंडळाला भरावा लागेल असा इशारा मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे.

  निर्बंध मुक्तीमुळे कोविड नंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यांनतर काही तासांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोसत्वासाठी देखील जोरदार तयारी सुरू झाली.

  गेल्या काही वर्षात मुंबई शहर व उपनगरातील नवरात्र उत्सव मंडळाची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरातील मैदान रस्ते व अन्य सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवीचे मंडप दिसून येतात.

  याच मंडप उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलेले आहे. मात्र हे मंडप (Pandals) उभारताना अनेक मंडळ सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ रस्त्यावर मंडपाचा बांबू रोवण्यासाठी खड्डा करतात. या खड्डे करण्यावर महापालिकेने पूर्णपणे बंदी घातली आहे.

  रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे केल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयांना रस्त्यांची, पदपथाची पाहणी करून रस्ते आणि पदपथाची दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पालिका रस्त्यावर खड्डे पाडू नये असे आवाहन वारंवार करते.

  मात्र काही मंडळ याकडे दुर्लक्ष करून खड्डे पाडतात. त्यांच्यावर पालिका कारवाई करते. गणेशोत्सवात रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे लालबागच्या राजा मंडळाकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

  नवरात्र उत्सवातही मंडपाची पाहणी करताना रस्त्यावर खड्डे दिसून आले तर, प्रती खड्डा २ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे पालिकेकडून मंडळांना सांगण्यात आले आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

  मंडळांच्या मंडपाची उंची २५ फूटपेक्षा अधिक असल्यास त्या मंडळांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. पालिका अधिकारी मंडपाची तपासणी करतील, त्यावेळी हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे मंडळांना सूचित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  मंडळाने ध्वनी मर्यादा पातळी संदर्भातील निकषाचेही पालन करणे बंधनकारक असून उत्सव साजरा झाल्यानंतर मंडप व अन्य बांधकाम स्वतःच्या जबाबदारीवर हटवण्यात यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

  पालिकेच्या जागेत, मैदानात, रस्त्यांवर तसेच पदपथावर खड्डे असल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या पहाणीनंतर त्या नवरात्रोत्सव मंडळाला दंड ठोठावला जाणार आहे. तसेच पालिका विभाग कार्यालय त्या ठिकाणी डागडुजी करणार असून रस्त्यात पाडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर केला जाणार आहे.

  एम. एम. पटेल, प्रमुख अभियंते, रस्ते विभाग(प्रभारी)