एचआयव्हीबाधितांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे; सीईओ मनीषा आव्हाळे यांचं मत

एचआयव्ही / एड्सबाधित रुग्णांना समाजामध्ये सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. पीडिताप्रती समाजाने भेदभाव करू नये. या आजारावर योग्य औषधोपचार घेतल्यानंतर मात करता येते. बाधित रुग्णांनी आजार झाल्यानंतर घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

  सोलापूर : एचआयव्ही / एड्सबाधित रुग्णांना समाजामध्ये सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. पीडिताप्रती समाजाने भेदभाव करू नये. या आजारावर योग्य औषधोपचार घेतल्यानंतर मात करता येते. बाधित रुग्णांनी आजार झाल्यानंतर घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

  एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित जनजागरण रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी आव्हाळे बोलत होत्या. या रॅलीस सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठता डॉ.जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, नोडल ऑफीसर डॉ. विठ्ठल धडके, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे डॉ. विजय चिंचोळकर आदी मान्यवर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  समाजामध्ये एचआयव्ही/एड्स आजराबाबत अनेक गैरसमज आहेत. याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून हे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. फक्त एक डिसेंबर रोजी जनजागृती न करता तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन या आजाराविषयी लोकांचे नियमित प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.

  यावर्षीच्या जागतिक एड्स दिनानिमित्तची थीम ‘आता नेतृत्व आघाडी समुदायाची’ ही असून, जे लोक एचआयव्ही संसर्गित आहे. त्यांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत पीडितासोबतचा भेदभाव संपवून त्यांना सन्मान देण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे, अशी माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

  रॅलीचा मार्ग…

  मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने व अन्य मान्यवरांनी हवेत फुगे सोडून जनजागृतीपर रॅलीचा शुभारंभ केला. ही जनजागृती रॅली सिव्हील चौक मार्गे सिध्दार्थ सोसायटी, मौलाली चौक, जगदंब चौक, सात रस्ता, शर्मा स्वीट्स, भगतसिंग मार्केट गार्डन मार्गे येऊन अश्विनी हॉस्पिटल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या जनजागृतीपर रॅलीसाठी सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थिनी, एन. एस.एस. विभागातील विभाग प्रमुख व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले होते.

  रॅलीत सहभागी विविध संस्था…

  एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर व शासकीय महाविद्यालय, सोलापूर, एम. एम. पटेल चॅरिटेबल स्ट्रट संचलित अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र, फॅमिली असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त सर्व मान्यवरांनी व उपस्थित महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ घेतली.