Dark shadow of water crisis over the district! The water level dropped, the lake was drying up

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी नागरिकांना दोन-तीन किलोमीटर दऱ्या-खोऱ्यात पायपीट करावी लागत असून पाणी मिळेलच याची देखील शाश्वती नाही

    रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी नागरिकांना दोन-तीन किलोमीटर दऱ्या-खोऱ्यात पायपीट करावी लागत असून पाणी मिळेलच याची देखील शाश्वती नाही. या परिसरातील विहिरी ,बारवांना पाण्याचा थेंब राहिला नसल्याने घोटभर पाणी टिपण्यासाठी नागरिकांना कोस-कोस दूर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आदिवासी भागात दिसुन येत आहे.

    खरंतर आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला. मात्र ज्यांच्यामुळे तालुका सुपीक झाला त्या आदिवासी लोकांच्या जमिनी धरणात गेल्या. मात्र त्याच आदिवासी नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दुसरे दुर्दैव नाही .सगळं आयुष्य शेवटाली गेल. आमा बायकांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला नाही. आघुटीच्या(पावसाळ्याच्या) तोंडावर हंडाभर पाण्यासाठी सगळा मुलुख पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाण्याचा थेंब राहिला नाही अख्खा दिवसभर पाणी टिपण्यातच जातो. पोटाला घास भर आन मिळना अशी परिस्थिती आम्हा बायकांची झाली असल्याच्या प्रतिक्रिया आदिवासी बायकांमध्ये ऐकायला मिळतात.

    -महिलांना भटकंती करावी लागते
    खरे तर आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागात दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यात पाण्यासाठी येथील आदिवासी बांधवांना सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागतो. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी भागातील महिलांना भटकंती करावी लागते. दुष्काळ आम्हा आदिवासी बायकांच्या पाचवीलाच पुजला हायं. हे केविलवाणी प्रतिक्रिया आदिवासी भागातील कोंढवळ येथील शेवंता डामसे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

    आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर तसेच पाटण आणि आसाणे खोऱ्यामध्ये असणाऱ्या जलस्रोतामध्ये पाण्याचा थेंबे राहिला नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे . कुपनलिका मधून देखील पाणी टिपावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आम्हा आदिवासी बांधवांच्या वाट्याला हे दुःख का? या सरकारचं काय घोडं मारलं ? डिंभे धरण आमच्या उशाला असून आमच्या हक्काचे पाणी आम्हाला का मिळत नाही असा सवाल आदिवासी बांधव करत आहेत.
    पुढे निवडणुका आल्या की या भागांमध्ये डिंभे धरणाच्या पाण्याच्या आश्वासनाचा पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यामध्ये निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आलेल्या पांढऱ्या कपड्यातील पुढारी आमच्या आदिवासी भागात फिरकत सुद्धा नाही हि मंडळी आता गेली कुठे असा सवाल आदिवासी बांधवांमधून व्यक्त होत आहे.

    -खाजगी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा
    सद्य स्थितीत आदिवासी पश्चिम भागामध्ये असणारे विहिरी शिवकालीन खडकांमधील टाक्या, बुडीत बंधारे, तळी या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबे राहिला नाही तर राहिलेले पाणी अत्यंत दुषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे आदिवासी भागातील जनतेला साथीच्या रोगांशी सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. सध्या तालुक्यांमध्ये आठ गावे आणि 44 वाड्यावर त्यासाठी आठ खाजगी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु संबंधित अधिकारी आणि टँकर चालक यांच्या मनमानी कारभारामुळे कधीतरीच आदिवासी भागाला पाणी दिले जाते त्यामुळे टँकर असूनही नसल्यासारखे आहे .