लोकसेवेच्या वाटचालीत आपला आशीर्वाद कायम रहावा; आमदार धंगेकर यांचे जनतेला साकडे

मी क्षत्रिय आहे. संघर्ष करणे, लढणे हे माझ्या रक्तात आहे. पण हा संघर्ष, हा लढा लोकांच्या सेवेसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे या लोकसेवेच्या वाटचालीत आपला आशीर्वाद असाच कायम पाठीशी रहावा, असे साकडे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जनतेकडे घातले.

  पुणे : मी क्षत्रिय आहे. संघर्ष करणे, लढणे हे माझ्या रक्तात आहे. पण हा संघर्ष, हा लढा लोकांच्या सेवेसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे या लोकसेवेच्या वाटचालीत आपला आशीर्वाद असाच कायम पाठीशी रहावा, असे साकडे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जनतेकडे घातले.
  कसबा विधानसभेच्या ऐतिहासिक विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहरात कृतज्ञता रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार धंगेकर माध्यमांशी बोलत होते.  सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला लोकांनी भरभरून प्रेम दिले. आशीर्वाद दिले. महापालिकेतून विधानसभेत पाठवले. एका सर्वसामान्य माणसावर जनतेने टाकलेला हा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
  धंगेकर म्हणाले, ‘आमदार झाल्यानंतर जुने वाडे, शहरातील वाहतूक, पाणी प्रश्न, मेट्रो, वाढते गुन्हे, पुणेकरांची सुरक्षितता, ड्रग्ज प्रकरण, आरक्षण अशा असंख्य विषयांवर विधानसभेत आवाज उठवला. अनेक प्रश्नांची सोडवणूक केली, याचे मला समाधान आहे. मी लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून जातो. कारण कुठल्याही पदांपेक्षा माणूसपण सर्वांत महत्त्वाचे आहे, असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे.
  पालिकेच्या पायऱ्यांवर टेकवले डोके
  आमदार रवींद्र धंगेकर यांच्या रॅलीची सुरवात ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथून दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर सारसबाग, जोगेश्वरी मंदिर, दगडूशेठ गणपती मंदिर यासह अनेक मंदिरात जाऊन मनोभावे पूजन करण्यात आले. रॅलीत अनेक सामान्य लोकांच्या, व्यावसायिकांच्या, विक्रेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.
  मला घडवणारे तुम्ही आहात, अशी भावना धंगेकर हे सर्वसामान्य लोकांकडे व्यक्त करत होते. रॅली महापालिकेच्या आवारात गेल्यानंतर प्रथम आमदार धंगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. महापालिकेच्या पायऱ्यांवरही डोके टेकवले. या वास्तूने मला खूप काही शिकवले आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या प्रत्येक हाकेला इथले अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, अशा भावना धंगेकर यांनी व्यक्त केल्या.