…म्हणून ‘त्यांचं’ थेट राष्ट्रपतींकडेच इच्छा मरणासाठी साकडे

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत (Jejuri Nagari) सतत भाविकांची वर्दळ असते. असे असताना बाह्यवळण रद्द करून जेजुरी शहरातून पुणे-पंढरपूर महामार्गावर रस्त्याच्या केवळ उत्तर बाजूकडील जागा भूसंपादन केली जात आहे.

    जेजुरी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत (Jejuri Nagari) सतत भाविकांची वर्दळ असते. असे असताना बाह्यवळण रद्द करून जेजुरी शहरातून पुणे-पंढरपूर महामार्गावर रस्त्याच्या केवळ उत्तर बाजूकडील जागा भूसंपादन केली जात आहे. यापूर्वीही दोनवेळा उत्तरेकडीलच बाजूचे जाणूनबुजून रुंदीकरण केले. त्यामुळे अनेक रहिवाश्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन कुटुंब उध्वस्त होत आहेत. यातील अनेक कुटुंबांनी हताश होऊन थेट राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे.

    पुणे ते पंढरपूर महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ साठी सर्व्हेक्षण होऊन भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरु आहे. यात अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याच्या मध्यातून समसमान अंतरावर खुणा न करता केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील भूसंपादन केले जात आहे. २००० आणि २०१५ साली सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करून केवळ उत्तरेकडील दुकाने व घरे पाडण्यात आली होती.

    दिशाभूल करून भूसंपादन सुरु

    या संदर्भात संबंधित प्रशासकीय कार्यालयात हरकती नोंदवूनही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही शासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देऊन एकतर्फी भूसंपादनाची प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन कुटुंबे उध्वस्त होत आहेत, अशी माहिती अन्याग्रस्त नागरिकांनी दिली.