मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात, यंदाचे दर किती? : जाणून घ्या एका क्लिकवर

लाल मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने यंदा दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीचा टप्पा पूर्ण केला असून हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तिखट चव घेण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे.

  नंदुरबार : लाल मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने यंदा दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीचा टप्पा पूर्ण केला असून हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तिखट चव घेण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे.

  तेलंगाना, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादन पिकाला मोठा फटका बसल्याने महाराष्ट्रातील मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये ओल्या व सुक्या लाल मिरचीला यंदा चांगला दर मिळाला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची आवक झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली आहे.

  गावरान मिरचीला 220 रुपये प्रति किलो दर

  ओल्या व सुक्या लाल मिरचीचा खरेदी-विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पथारीवरील लालेलाल मिरची गायब झाली आहे. यंदाचा मिरची हंगाम शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी चांगला दर देऊन गेला सध्या गावरान लाल तिखट मिरचीला 220 रुपये प्रति किलो दर असून फापडा, जवेरी, लवंग आदी मिरचीला 170 रुपये प्रति किलो दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे यंदा गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

  मिरची उत्पादनात मोठी घट

  बदलते हवामान मिरची पिकावरील वेगवेगळे वायरस रोग व हायब्रीडमुळे पारंपारिक मिरचीच्या चवीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा दर वाढले आहे. एकूणच नंदुरबारमधील मिरचीची बाजारपेठ यंदा कमी उत्पादनामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा दर दुप्पट मिळाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.