वेदांता प्रकल्पासाठी टक्केवारी मागितली हे धादांत खोटं – अजित पवार

    पुणे : बुधवारी दसरा मेळाव्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची तोफ बीकेसी मैदानावर दणाणली. यावेळी शिंदे यांनी अनेक गौप्यस्फोट करताना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर (Vedanta-Foxconn Project) देखील भाष्य केलं. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेनेनं (Shivsena) टक्केवारीनं कमिशन मागितल्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी केला. याच आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.

    महाविकास आघाडीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्र्याच्या आरोपावर उत्तर देताना म्हंटले, ‘टक्केवारी मागितली हा आरोप धादांत खोटा आहे. आरोप करत असाल तर तो सिद्धही करून दाखवा, असं आव्हान अजित पवार यांनी दिलंय. केवळ राजकीय टिप्पण्या करायच्या म्हणून काहीतरी बोलण्याला अर्थ नाही. तर शिंदे सरकारच्या चुकांमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय, असं अजित पवार म्हणाले.

    दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांनी मुंबईतल्या शिवसेनेच्या दोन मेळाव्यांवरही भाष्य केलं. वेदांता प्रकल्पावरून शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘टक्केवारी मागितली हे धादांत खोटं आहे. कुणी आरोप करत असेल तर त्याने सिद्ध करून दाखवावं. कारण वेदांताबद्दल मी मीडियाला दाखवलं होतं. चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैत मीटिंग झाली होती. सरकार जूनमध्ये गेलं. जुलैत हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली. त्यात हाच विषय होता.वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हा शिंदे आणि भाजप सरकारच्या चुकांमुळे गेला आहे, आणि याच सोबत २ लाख तरुणांचा रोजगार देखील गेला आहे. तरुणांचा रोष आपल्यावर येईल, हे लपवण्याकरिता त्यांनी हे वक्तव्य केलंय, असा आरोप अजित पवारांनी केला.

    मुंबईत शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यावर अजित पवार म्हणाले, दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण असताना उभ्या महाराष्ट्रानं हे मेळावे पाहिले. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याने सर्वांना कुतूहल होतं. दोन्हीकडे गर्दी होती. कशी गर्दी होती.. हेही पाहिलं. तसेच झेंडा शिवसेनेचा अजेंडा राष्ट्रवादीचा या शिंदेच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले, याला काहीही अर्थ नाही. कारण तेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात होता. माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे.. तेव्हा काही म्हणाले नाहीत. तिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही होती. अनेक वर्षांचा आम्हाला अनुभव आहे.