महाबळेश्वर बाजारपेठेत वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी; पत्रकारांच्या आंदाेलनाला यश

    महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेत वाहनांसाठी प्रवेश बंद असताना देखील बोकाळलेल्या वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी महाबळेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाने केलेल्या आंदोलनाचे कौतुक करून या पुढे बाजारपेठेत वाहनांसाठी कायमस्वरूपी प्रवेशबंदी राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

    डॉ. साबणे रोड या मार्गावरून वाहतूक बंद असताना देखील स्थानिक नागरीकांची वाहने या रोड वरून दिवसभर ये जा करीत असल्याने पर्यटकांना, व्यापारी यांना मोठया प्रमाणावर त्रास होत होता. अनेक वेळा या संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, परंतु याचा कोणताही फायदा झाला नाही. अखेर महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने या प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व पत्रकार पोलिस ठाण्याच्या समोर ठिय्या मारून उपोषणाला बसले. पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य विलास काळे, ज्येष्ठ सदस्य बबनराव ढेबे, रमेश पल्लोड, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, सचिन जाधव, अजित कंुभारदरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देत पाठिंबा दिला. पत्रकारांनी केलेल्या आंदोलनास यश आल्याने मुख्य बाजारपेठेतील वाहतूक बंद झाली.

     स्वयंचलित बॅरिगेट्स उभारण्याची सूचना
    जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या आंदोलनाचे कौतुक केले. बाजारपेठेतील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून यापुढे देखील महाबळेश्वरची बाजारपेठ वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद असेल असे सांगून वाहतूक रोखण्यासाठी स्वयंचलित बॅरिगेट्स उभारण्याची सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी पालिका प्रशासक योगेश पाटील यांना दिल्या.