petition against negligence in jumbo covid centre municipal administration denies allegations claims petition is false and misleading motion to dismiss nrvb

याचिकाकर्त्यांची हर्नियाची (आंत्रगळ) शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात जाळी बसविण्यात आली होती. त्यांच्याच डॉक्टरांनी नोंदवलेल्या निरीक्षणामध्ये याचिकाकर्त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे पोटात बसविण्यात आलेल्या जाळीला संसर्ग झाल्याचे नेमके कारण असू शकते.

    मयुर फडके, मुंबई : कोरोना काळात (Covid-19) बीकेसीतील जंबो कोविड सेंटरवर (Jumbo Covid Center in BKC) वैद्यकीय निष्काळजीचा आरोप (Allegation of medical negligence) करून ३६ लाख रुपये नुकसानभरपाई (36 lakh as compensation of Rs) देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून (BMC Administration) याचिकेला विरोध करण्यात आला आहे. याचिकेत तथ्य नाही याचिका खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा करून फेटाळण्याची मागणी पालिकेने प्रतिज्ञापत्रातून केली आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी असलेले दीपक शहा (५४) यांनी बीकेसीतील जंबो कोविड सेंटरमधील डॉक्टरांचा वैद्यकीय निष्काळजी आणि अयोग्य वैद्यकीय उपचार पद्धतीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचा दावा याचिकेतून केला आहे. त्यावर गुरुवारी न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमोर पालिकेच्यावतीने बीकेसी जंबो कोविड-सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. याचिकाकर्त्यानी वस्तुस्थिती दडवली असून दिशाभूल करणारी विधाने केली असल्याचा दावा करून याचिका फेटाळण्याची मागणी प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

    याचिकाकर्त्यांची हर्नियाची (आंत्रगळ) शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात जाळी बसविण्यात आली होती. त्यांच्याच डॉक्टरांनी नोंदवलेल्या निरीक्षणामध्ये याचिकाकर्त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे पोटात बसविण्यात आलेल्या जाळीला संसर्ग झाल्याचे नेमके कारण असू शकते. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेतल्यामुळे संसर्ग झाल्याचे सांगणारा कोणताही वैद्यकीय अहवाल सादर केलेले नाहीत, त्यामुळे याचिकेत तथ्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

    कोविड सेंटरमध्ये मिळाले सर्वोत्कृष्ट उपचार

    करोना काळात पालिकेने मुंबईतील लाखो लोकांवर उपचार केले होते. बीकेसीतील कोविड सेंटर सर्वोत्तम कोविड केंद्रांपैकी एक होते. तेथील रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार उपलब्ध करून देण्यात आले होते. सुमारे २७ हजार कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. याचिकाकर्त्यांनी दहा दिवस त्यांच्याच घरी स्वत: औषधोपचार केल्यानंतर त्यांना बीकेसीमध्ये दाखल करण्यात आले होते.

    याचिकाकर्त्यांवरही शक्य तेवढे योग्य उपचार करण्यात आले आणि कोविड निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या याचिकेला न्यायालयाने फार महत्व देऊ नये, तसे केल्यास अशाप्रकारे इतर याचिकाही दाखल होतील, असा युक्तिवाद मुंबई महानगर पालिकेकडून अँड. अनिल साखरे यांनी केला.