मतदारयाद्या सदोष, दुरुस्ती करून नव्या याद्या करा; भाजपची मागणी

फलटण नगरपरिषद आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ ते १३ च्या प्रभागनिहाय मतदारयाद्या सदोष असून, त्या रद्द करुन नवीन याद्या तयार कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    फलटण : फलटण नगरपरिषद आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ ते १३ च्या प्रभागनिहाय मतदारयाद्या सदोष असून, त्या रद्द करुन नवीन याद्या तयार कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्याकडे माजी नगरसेवक अशोकराव जाधव आणि भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केली असून, या निवेदनासोबत मतदार याद्यामधील चुका दर्शविणारे काही कागद जोडले असल्याचे सांगण्यात आले आहे.

    नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्या तपासता नकाशाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी हद्दीबाहेरील नावांचा समावेश असल्याचे नमूद करीत प्रत्येक प्रभागात २०० ते ३०० नावे प्रभाग निहाय व स्थळ दर्शविल्याप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील जाहीर केलेल्या नकाशानुसार सदर याद्या  B. L. O. यांच्याशी विचार विनिमय न घेता मागील पद्धतीने केल्या असल्याने त्या याद्यांमध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत. तरी जाहीर झालेल्या प्रभाग नकाशा प्रमाणे ज्या प्रभागातील नावे त्यामध्ये समाविष्ट करुन नवीन योग्य मतदार याद्या तयार करत, त्या पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.