
कल्याण ग्रामीण : कल्याणमध्ये भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सत्तेत असलेल्या भाजपवर टीका केली जाते. दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकाकडून फक्त बॅनर नाही तर आमदार राजू पाटील यांच्या कामाचे कौतुकसुद्धा करण्यात आले आहे. कल्याण ग्रामीणमध्ये रस्ते काॅंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमीपूजन कार्यक्रमादरम्यानही प्रसंग घडला आहे.
कल्याणमध्ये मनसे-भाजप-शिवसेनेमध्ये नेहमीच कलगीतुरा
कल्याणमध्ये राजकीय घडामोडी दररोज घडतात. सत्तेत असलेले दोन पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद समोर येतो. सत्तेला पाठिंबा देणारी मनसेकडून देखील भाजप शिवसेनेवर टिका केली जाते. मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडूनही देखील सातत्याने विकास कामांच्यावर नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो.
राज्यभरात मनसेकडून वेगळी भूमिका
सध्याच्या राजकारणात कल्याणच नाही तर राज्यभरात मनसेकडून वेगळी भूमिका घेण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. इतकेच नाही तर लोकसभा निवडणूकीची तयारी मनसेने सुरु केली आहे. हे सगळे घटत असताना कल्याण पूर्व भागातील पिसवली भागात भाजप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्याकडून रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
भाजप नगरसेवकाच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो
या कार्यक्रमात भाजप नगरसेवकाच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो होता. या प्रकरणी माजी उपमहापौर भोईर यांच्याकडे विचारणा केली गेली. तेव्हा त्यांनी सांगितले की, भाजपच्या बॅनरवर मनसे आमदारांचा फोटो हा विषय नाही. माझ्या प्रभागात विकासासाठी मी प्रयत्नशील असतो. आमदार पाटील यांच्याकडे विकास कामाकरीता पाठपुरावा केला होता. त्यांच्याकडून आम्हाला विकास कामाकरीता निधी प्राप्त झाला. त्या अर्थी ब’नरवर त्यांचा फोटो येणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचा दुसरा काही राजकीय अर्थ नाही. भाजपमध्ये मी समाधानी आहे. यापूढेही भाजपचेच काम करणार. मनसेचे आमदार हे कल्याण ग्रामीणचे खऱ्या अर्थाने आमदार आहे. त्या दृष्टीने ते काम करीत आहेत. हे भोईर यांनी आवर्जून सांगितले