अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नकार दिल्याने नंतर चटकेही दिले; अकोला जिल्ह्यातील घृणास्पद प्रकार

शहरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला जबरदस्ती घरात ओढून नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार (Crime in Akola) केला. तसेच मुलीने नकार दिल्यानंतर तिला सिगारेटचे चटके देण्याचा प्रकार खदान पोलिस स्टेशनअंतर्गत घडला.

    अकोला : शहरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला जबरदस्ती घरात ओढून नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार (Crime in Akola) केला. तसेच मुलीने नकार दिल्यानंतर तिला सिगारेटचे चटके देण्याचा प्रकार खदान पोलिस स्टेशनअंतर्गत घडला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

    खदान पोलिस स्टेशनअंतर्गत आरोपी गणेश कुमरे याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात ओढून तिच्यावर दारूच्या नशेत अत्याचार केला. मुलीने नकार दिल्यानंतर तिला सिगारेटचे चटके देण्यात आले. तसेच तिच्या डोक्यावरील केसही कापण्यात आल्याची चर्चा असली; तरी पोलिसांनी त्यास नकार दिला. खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तक्रारीनुसार मुलगी 15 वर्षांची असून, आरोपीने धमकावून अश्लील चाळे केले. तो मुलीला नेहमीच त्रास द्यायचा. त्याने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलगी दहशतीमध्ये असल्याने तक्रार देण्यास घाबरत होती.

    दरम्यान, याप्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या अरुंधती शिरसाट, प्रभा शिरसाट, पुष्पा इंगळे, वंदना वासनिक, आम्रपाली खंडारे, सचिन शिराळे, गजानन दांडगे, गणेश सपकाळ, सुनंदा चांदणे आदींनी खदान पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.