
बांगलादेशी १७ वर्षीय मुलीला कामाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात आणून तिचे बनावट भारतीय ओळखपत्र (Indian Identity Card) बनविले. तसेच, त्यानंतर तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitution) करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : बांगलादेशी १७ वर्षीय मुलीला कामाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात आणून तिचे बनावट भारतीय ओळखपत्र (Indian Identity Card) बनविले. तसेच, त्यानंतर तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitution) करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीकडून पुणे, मुंबई व चेन्नईत वेश्या व्यवसाय करून घेतला असून, गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पुण्यातील दोघांसह 5 जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 17 वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नईमा, शाहीकुल, बोवकार मंडोल, युसुफ, ताहीरा (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी बांगलादेशी असून, तिला गेल्या वर्षी नईमा या महिलेने काम देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले. विनापरवाना बांगलादेशातून तिला पालघर आणले. तिथे तिचे भारतीय आधारकार्ड बनविले. त्यानंतर तिला चेन्नई येथे नेले. त्याठिकाणी नईमाच्या मामाने पीडित मुलीसोबत वारंवार अत्याचार केले.
बांगलादेशात सोडतो म्हणाला अन्…
अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने ओळखीच्या शाहीकुलला बोवकार मंडोल याला संपर्क केला. बोवकार मंडोलने मुलीला बांगलादेशात सोडतो, असे खोटे सांगून मुंबई येथे त्याच्या घरी घेऊन गेला. तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. पीडित मुलीने नकार दिला असता तिला मारहाण केली.
वेश्या व्यवसायास नकार देताच शिवीगाळ, मारहाण
यानंतर पीडितेने तिच्या आईने दिलेल्या काकाच्या नंबर फोन केला. ती सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे गेली असता युसुफने तिला फोन केला. तुला बांगलादेशात सोडतो असे सांगून पुण्यातील तुळशीबागेत राहणारी बहिण ताहीरा हिच्याकडे आणून सोडले. ताहिराने मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पीडित मुलीने नकार दिला असता ताहीराने तिला शिवीगाळ करुन मारहाण करुन डांबून ठेवले.