‘माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत विवाहितेचा छळ; भूलथापा देऊन माहेरी पाठवलं अन्…

'माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये', असे म्हणत 31 वर्षीय नवविवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला. ही घटना अमरावती येथील अनंत विहार कॉलनी येथे घडली.

    वर्धा : ‘माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये’, असे म्हणत 31 वर्षीय नवविवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक तसेच मानसिक छळ (Dowry Case) करण्यात आला. ही घटना अमरावती येथील अनंत विहार कॉलनी येथे घडली. विवाहितेला भूलथापा देऊन वर्धा येथे माहेरी पाठविण्यात आले. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पतीसह सासू-भासरे नणंद अशा पाच जणांविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पती सिद्धार्थ वानखेडे, सासू कुसूम वानखेडे, भसरे सुधीर वानखेडे, ननंद शारदा इश्वर ढोके, सुनिता विजय कसबे, सुरेखा विलास हिवराळे अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहे. नमुद तक्रारीनुसार, डिसेबर 2022 मध्ये 31 वर्षीय महिलेचे रितीरिवाजाने सिद्धार्थ वानखेडे यांच्याशी लग्न झाले. यात सुरूवातीचे काही दिवस ठीक गेले.

    दरम्यान, माहेरून काहीच घेऊन आली नसल्याच्या कारणातून पतीसह सासूने छळ सुरू केला. ‘माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणून तगादा लावला. यात माहेरी आलेल्या नणंद याही दहा-पंधरा दिवसातून येत पैशासाठी छळ करत होत्या. महिला गर्भवती राहिली असता सासरच्या मंडळींनी गर्भपात केला. तरीही छळ सुरूच होता. भूलथापा देऊन महिलेस माहेरी वर्धा येथे सोडले. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून रामनगर पोलिसात सासरच्या मंडळी विरोधात गुन्ह नोंद करण्यात आला आहे.