गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; नंतर ब्लॅकमेल करून उकळले 4.50 लाख

फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने विवाहित महिलेशी मैत्री केली. शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नाहीतर अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रोकड आणि दागिन्यांसह 4.50 लाख रुपयेही उकळले. ही घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

    नागपूर : फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने विवाहित महिलेशी मैत्री केली. शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नाहीतर अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रोकड आणि दागिन्यांसह 4.50 लाख रुपयेही उकळले. ही घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

    पोलिसांनी पीडित 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. श्याम सुपतकर (रा. हनुमाननगर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. श्यामने फेसबुकवर श्याम वर्मा या नावाने बनावट प्रोफाईल बनवले होते. 2020 मध्ये त्याने पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. श्यामने एअरफोर्समध्ये अधिकारी असून, गुजरातला तैनात असल्याची तिला बतावणी केली होती.

    23 मे 2020 रोजी श्यामने महिलेला भेटायला मेडिकल चौकात बोलावले. त्याच्या कारमध्ये आधीच एक तरुणी बसलेली होती. श्यामने ती त्याची बहीण असल्याचे सांगितले. पीडितेला शीतपेय देण्यात आले. ते पिताच पीडिता बेशुद्ध पडली. श्याम तिला खापरी परिसरातील एका झोपड्यात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराचे त्याने मोबाईलने चित्रिकरण आणि फोटोही काढले. या दरम्यानच त्याने पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःच्या ई-मेल आयडीवर तिच्या ओळखीतील सर्वांचे नंबर घेतले. शुद्धीवर आल्यावर पीडितेने त्याला फटकारत जाब विचारला असता त्याने तिला मारहाण करत बदनाम करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो पीडितेला ब्लॅकमेल करू लागला.

    बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने श्यामला 2.50 लाख रोख आणि सोन्याचे दागिनेही दिले. त्यानंतरही श्याम तिला ब्लॅकमेल करत होता. पीडितेने त्याच्याबाबत माहिती काढली असता समजले की, त्याने वेगवेगळ्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते उघडले आहेत. तो इतर महिलांनाही जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करतो, त्यानंतर पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.