
कुर्डुवाडी : अकलूज येथे सोमवारी भरत असलेल्या बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन जात असताना कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर कुर्डू (ता. माढा) गावच्या शिवारात जनावरे घेऊन निघालेल्या पिकअपला समोरून येणाऱ्या खासगी लक्झरी बसने ओव्हरटेक करताना समोरून जोराची धडक दिली.
पिकअप चालकाचा जागीच मृत्यू
या धडकेत पिकअप चालक अजहर शफीक कुरेशी (वय ३१, रा. पापनस, ता. माढा) याचा जागीच मृत्यू झाला, तर दिशान हरूण कुरेशी रा. पापनस, ता. माढा, लक्झरी बसचालक देविदास परशुराम मुत्तलवाड रा.मुखेड व बसवंत वाघमारे रा.शिवली ता.औसा जि.लातुर हे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार दि.१८ रोजी पहाटे ४.१५ वा. सुमारास घडली. याबाबत बस चालक देवीदास परशुराम मत्तलवाड रा.मुखेड यांच्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अकलूजचा आठवडी बाजार
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवार हा अकलूजचा आठवडी बाजार असल्याकारणाने पापनस ता. माढा येथील ५ म्हशी घेऊन पिक अप (एमएच-२० डीई -२०९२) चालक अजहर शफिक कुरेशी व दिशान हरुण कुरेशी हे अकलूजकडे जात असताना पहाटे ४.१५ वा सुमारास कुर्डू ता. माढा शिवारात माळीपाटीजवळ पुण्याकडून लातुरकडे जाणाऱ्या लक्झरीबस (एनएल- ०१,बी -१२६६) च्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअपला समोरुन जोराची धडक दिली.
दोन म्हशींचा जागीच मृत्यू
या अपघातात पिक-अप चालकाचा व दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर लक्झरी बसच्या चालकासह इतर दोन जण अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना बार्शी व सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये एक म्हैस देखील गंभीर जखमी झाली असून इतर जनावरे अपघात घडताच बाहेर पडल्याने सुखरूप सुटका होऊन बचावली आहेत.