पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीचा ६०० कोटींचा टप्पा केला पार; थकबाकीदार रडारवर

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेच्या (PCMC) कर आकारणी (Tax Collection) व कर संकलन विभागानं ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुली केली आहे. कर संकलन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी महिन्यातच महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर (Property Tax) जमा झाला आहे.

  पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेच्या (PCMC) कर आकारणी (Tax Collection) व कर संकलन विभागानं ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुली केली आहे. कर संकलन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी महिन्यातच महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर (Property Tax) जमा झाला आहे. तसेच अद्याप १ लाख ६० हजार निवासी मालमत्ताधारकांकडे तब्बल ४५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. उर्वरित मालमत्ता धारकांनी मिळकत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

  दरम्यान, दुसरीकडे मालमत्ता कराची मोठी थकबाकी असणारे मालमत्ता धारक महानगरपालिकेच्या रडारवर आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ९१ हजार मिळकतींची नोंद आहे. यंदाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर आकारणी व कर संकलन विभागाने १००० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत ६०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे ही रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली आहे.

  तसेच जास्तीत जास्त कर वसूली व्हावी, यासाठी शहरातील थकबाकीदारांना विभागाने नोटीस बजावून जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांवर सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे थकीत कर वसूल करण्यास महापालिकेला यश येत आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करून शहर विकासात योगदान द्यावे,’ असे आवाहनही महानगपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

  पाचशेच्या वर मालमत्ता केल्या सील

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागानं आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले जात आहेत. महानगपालिकेतून प्राप्त आकडेवारीनुसार २८ जानेवारी २०२३ पर्यंत मालमत्ता कर थकबाकी न भरल्यामुळे ५२६ मालमत्ता सील केल्या आहेत. याशिवाय, आतापर्यंत ८ हजार ८३६ जप्ती अधिपत्र तयार केली आहेत. तसेच ३ हजार २२५ मालमत्तांवर जप्ती अधिपत्रानुसार कारवाई केली आहे. जप्ती कार्यवाहीनंतर २ हजार ८१२ मालमत्तांचा कर वसूल झाला आहे. जप्ती कार्यवाहीतून वसूल झालेली कराची रक्कम ही तब्बल ४३ कोटी ६८ लाख २१ हजार २३२ एवढी आहे.

  नोटीसा बजावण्यास सुरुवात

  कर आकारणी व कर संकलन विभागाने रुपये १० हजार, २५ हजार, ५० हजारपुढे मूळ कर व थकबाकी असलेल्या मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

  या विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत नेमक्या किती नोटीस पाठवल्या आहेत, ते जाणून घेऊया.

  • १० हजार रुपये पुढील मालमत्ता – ४४६७९
  • २५ हजार रुपये पुढील मालमत्ता – ३६५४९
  • ५० हजार रुपये पुढील मालमत्ता – २६७६०
  • पाच लाखांपुढील थकीत कर असणाऱ्या मालमत्ता – १३६०

  आकारणी झाल्यापासून एकदाही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या मालमत्ता नोटिसा : ३८५०

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाही, त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. दहा हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपयांच्या पुढील मालमत्ता जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. सर्व जप्ती अधिपत्रांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोसायटी वगळता अन्य ज्या निवासी मालमत्तांकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येत आहे.

  – निलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग

  आर्थिक वर्षांतील दहा महिन्यांत ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर वसूल झाला आहे. मात्र, अद्यापही मोठे लक्ष गाठणे बाकी आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यासाठी आता फेब्रुवारी व मार्च असे दोन महिने शिल्लक आहेत. या दोन महिन्यात उर्वरीत मालमत्ता करधारकांकडून कर वसुली करण्याचे नियोजन महापालिकेने केल आहे. ज्या करदात्यांनी अद्याप महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरला नाही, त्या नागरिकांनी मालमत्ता कर वसुलीचे १००० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तात्काळ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.

  – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक