धर याला, चाव, छू…, अंगावर सोडला पिटबुल कुत्रा; जाणून घ्या नेमकं झालं काय?

पिटबुल कुत्रा अंगावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार पर्वती परिसरात घडला असून, हा कुत्रा एकाला दोन ठिकाणी चावल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. नागरिकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कुत्रा मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : पिटबुल कुत्रा अंगावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार पर्वती परिसरात घडला असून, हा कुत्रा एकाला दोन ठिकाणी चावल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. नागरिकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कुत्रा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी नगर परिसरात रविवारी हा प्रकार घडला.
    याप्रकरणी गणेश मेरूकर (रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, रा. पर्वती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहित मल्लाप्पा शिंगे (वय ३०) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व गणेश मेरूकर हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. गणेश यांनी पिटबुल जातीचा कुत्रा पाळला आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गणेश मेरुकर हे पिटबुल श्वानाला साखळी न लावता त्याला फिरण्यासाठी मोकळे सोडले होते. तक्रारदार हे देखील बाहेर फेरफटका मारत होते. त्यांनी श्वान मोकळा असल्याचे पाहिले आणि त्यांनी गणेश याला श्वानाला साखळी लावत जा, तो कोणाला तरी चावेल असे सांगितले.
    दरम्यान याचा राग गणेश याला आला. त्यांच्यात वाद झाले. वादातून त्यांना शिवीगाळ करत त्यांचा हात पिरगळला. तसेच, श्वानाला “धर याला, चाव, छू…” असे म्हणाले. तेव्हा श्वान तक्रारदारांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्या उजव्या मांडीला दोन ठिकाणी तो चावला. यात तक्रारदार जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निकाळजे हे करत आहेत.