कार्यालयात पत्ते खेळणे पोलिसांना पडले महागात; तीन पोलिस कर्मचारी निलंबित

लकडापूल येथील गुन्हे शाखा युनिट 3 च्या कार्यालयात बसून पत्ते खेळणे 3 पोलिसांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण गंभीरतेने घेतले. पत्ते खेळणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले.

    नागपूर : लकडापूल येथील गुन्हे शाखा युनिट 3 च्या कार्यालयात बसून पत्ते खेळणे 3 पोलिसांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण गंभीरतेने घेतले. पत्ते खेळणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. पोलिस हवालदार आनंद काळे, शेख फिरोज आणि शिपाई रवींद्र करदाते अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी तिन्ही आरोपी युनिट कार्यालयात बसून पत्ते खेळत होते. या दरम्यान कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. कार्यालयात बसून पत्ते खेळत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीनंतर तिघांनाही निलंबित करण्यात आले.

    या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. इतर कर्मचाऱ्यांनुसार, सोबत काम करणाऱ्यांपैकीच कोणीतरी हा व्हिडिओ बनवला आहे. कार्यालयात बसून पत्ते खेळणे चुकीचे असले तरी ते केवळ टाईमपास करत होते, जुगार खेळत नव्हते. अशात व्हिडिओ बनवणाऱ्या विभिषणाबद्दलही विभागात नाराजी आहे. या प्रकरणात आणखीही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.